Archive for सप्टेंबर, 2009

पदवी कॉल्ड “बाबा”..

ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो शेवटी ३ सप्टेंबरला तो दिवस उजाडला. मी “बाबा” झालो. एका गोंडस जीवाने या धरतीवर आपल्या आगमना प्रीत्यर्थ “ट्याट्या” फोडून मला आणि सौला अनुक्रमे “बाबा” आणि “आई” अशा पदव्या बहाल केल्या.

मातीचा गणपती उठला आणि जिवंत मूर्ती घरात आली. सगळे अगदी खूश होते. माझ्या आई-बाबांना तर आभाळ ठेंगणे झाले होते. सगळ्या आप्त-सकीयांचे फोन येण्यास सुरुवात झाली.

“Congrats!! “.. “Hearly congratulations!! ” वैगरे वैगरे.

बऱ्याचं लोकांचा एक कॉमनं प्रश्न असायचा.. “मग आता काय बदल जाणवतोय? “..

“बराच.. पुण्याला बिलकुल पाऊस नाही हो.. आणि मुंबईत बघाना कसा धो-धो पडतोय”.. मी आपला निरागस उत्तर देत होतो.

“अहो.. तसे नाही हो.. बाबा झालात ना तुम्ही मग.. काय बदल वाटतोय? ”

आता या सद्ग्रुहस्ताला कोणीतरी बाबा झाले की दोन छोटीशी शिंग फुटतात किंवा अचानक केस पांढरे होतात किंवा मिशा येतात असे काही तरी सांगितले असावे. म्हणून २-३ वेळा विचारून खातरी करत असावे. आता मला सांगा मुलगा होऊन जेमतेम १-२ दिवस झालेले, त्यात असा कुठला बदल जाणवणार आहे हो?.. असो

आता या प्रश्नावर विचार केल्यावर असे वाटते की खरंच, काय बदल अपेक्षीत असला पाहिजे? चेहऱ्यावर ४० वर्षे जजची खुर्ची सांभाळून रिटायर्ड झाल्या सारखा गंभीर चेहरा करावा की आहे तसंच हसत खेळत राहावे.

माझ्यामते तर मला माझे बालपण या चिमुकल्या बरोबर पुन्हा जगायला आवडेल. बघूया कितपत जमतेय ते.. 🙂

Advertisements

कार चालक प्रशिक्षण – एक छळ..

भारतात आल्या-आल्या काय जोष चढला होता काय माहिती पण कार घेण्याचे भूत माझ्या मनात थैमान घालते होते… (काय आहे बँकेत जरा जास्त पैसे दिसतं असले की त्याला वाट फोडण्याचे असे खूळ माझ्या मनात आलेच म्हणून समजा.. ) तर पहिली पायरी म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायचे ठरवले व नोंदणी केली.

प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता आणि त्या प्रशिक्षकाने मला माझ्या संपूर्ण शालेय जीवनात कोणी झापलं नसेल असे धडे(झापले) दिले. मी आपला अमेरिकेचा जवळ-जवळ २०००-२५०० माईल्स कार चालवण्याचा अनुभव चेहऱ्यावर मिरवतं कारमध्ये बसलो. मी आणि अजून एक आजोबा आणि एक तरुणी (बहुतेक तिला तिच्या वडिलांनी “तुला तुझ्या पुढच्या वाढदिवसाला कार घेऊन देणार” असे आश्वासन दिले असणार.. असले बाबा आम्हाला का बरं नाही मिळाले.. 😦 असो)

प्रथम आजोबांनी कारचा ताबा घेतला.. बहुतेक सीनियर सिटीजनाच नियम येथे सुद्धा लागू होतो असा त्यांचा समज असावा कारण ‘त्या’ तरुणीने जेव्हा प्रथम ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजोबांनी जो कटाक्ष टाकला त्यामुळे ती सुद्धा बिचकली. एक तर सकाळची ऑफिसची वेळ त्यामुळे ट्रॅफिक अपनी पुरी जवानी पे था आणि दुसरे म्हणजे नेहमी प्रमाणे रस्त्याचे काम सुरू होते त्यामुळे आणखीन कोंडी होत होती आणि आजोबा आपल्या तरुण पणीचे दिवस आठवतं तो एक्सलेटर पूर्णं जोर लावून दाबत होते. त्यांचा चेहरा बघून तो जोर “दुसरी” कडे पडून काही भलतेच होईल का अशी शंका वाटत होती 🙂 आजोबा पूर्णतः गडबडले होते कारण इतका एक्सलेटर दाबूनही ही गाडी पुढे का जात नाही.

“काय करताय पहिले गेयर तर टाका. ” तुसडेपणा या शब्दाचा पुरेपूर समर्थन करीत त्या प्रशिक्षकाने आपला दिवस सुरू झाल्याची ग्वाही दिली.

“अहो.. काय करताय.. नीट बघा.. वळवा ना.. अरे गेयर बदला ना.. ” असे एक ना दोन पाणउतारा करणारे घोषवाक्य म्हणत तो आम्हाला शिकवत (??? ) होता. मग आजोबांचे खेळणे झाल्यावर “त्या” तरुणीने गाडीचा ताबा घेतला. मी असतील-नसतील तेव्हड्या देवांना साकडं घातले (एक कोणीतरी येईलच वाचवायला).

तिने बसल्या-बसल्या पहिले हॉर्न वाजवला. मला वाटले की ती तपासून बघत असेल. पण नंतर पूर्णवेळ ती त्या हॉर्नवरच बसली होती. तिला बहुतेक घरून सांगितले असेल “बेटा.. दर २-३ सेकंदाने हॉर्न वाजवायचा”. मी अमेरिकेतले दिवस आठवत होतो.. तिथे खरंतर हॉर्न हा गाडीचा ऑप्शनल पार्ट असतो… असो 🙂

मग शेवटी माझी वेळ आली. मी आपला आपल्याला गाडी येते या तोऱ्यात बसलो. गाडी चालू केली आणि एक्सलेटर दाबला. पण हे काय? गाडी पुढे का जात नाही? मग प्रशिक्षकाने गोड आवाजात “अहो.. गेयर तर टाका. नुसते एक्सलेटर काय दाबताय. “वैगरे बोलून माझा उद्धार सुरू केला. मी आपला अरे हो खरंच की वैगरे बोललो आणि गेयर टाकायला गेलो तर.. “ख्खरखर्ख्र” असा विचित्र आवाज येत होता. मग तो प्रशिक्षक जाम चिडला व कुठून-कुठून लोक गाडी शिकायला येतात असला “लुक” देत गेयर टाकला.

मग मी त्या जत्रेरुपी रोड(??? काही केल्या दिसतं नव्हता) वर निघालो. डावीकडून, उजवीकडून मागून पुढून (अवचोर ध्वातात – अर्थात चारही दिशांनी) सगळीकडून बाइक, कार, सायकल, पादचारी, गाय, म्हॅस (ह्या शेवटच्या दोन वाहनांवर कोणी बसले नव्हते 🙂 ) असे विविध वाहने येत होती. मला तर वाटत होते की अजून काही वेळात गाडी वरून सुद्धा काही वाहने निघतील. तो प्रशिक्षक सारखा माझ्या अंगावर खेकसत होता “अरे.. गाडी चालवा.. वेग वाढवा” मी मात्र पूर्णतः गडबडलो होतो. साला जागा कुठे आहे गाडी जायला.

शेवटी हो-नाही करत एकदाचा माझा क्लास संपला(एकदाचा). नंतरच्या क्लास मध्ये मी त्या प्रशिक्षकाला कधीच सांगितले नाही की मला गाडी येते म्हणून.. 😦