Archive for the ‘अनूभव..’ Category

काल माझ्या मित्राचा फ़ोन आला होता. तो घर घेतोय आणि एस.बी.आय. बँकेकडुन लोन घेण्याबद्दल तो विचारत होता. मी त्याल म्हटले लोन तर मिळेलच पण त्या आधी २-३ गोष्टींची तयारी ठेव.

१. कमीत-कमी शब्दात स्वतांचा पाणउतारा करुन घेणे
२. लोनची तुला गरज आहे बँकेला नाही
३. तुझ्यापुढे राहुल राँय सुद्दा बीझी वाटेल इतका तु रिकामा आहेस.
४. तुज़्या जीवनात लोन पास करुन घेणे हे एकच धेय राहिल (निदान पुढचे २-३ महिने)

मी हे सगळे सांगीतल्यावर तो जरा घाबरलाच. मी म्हटले घाबरु नको रे, पण मनाची तयारी करुन ठेव. साहेबांनी डोक्यावर जास्त ताण न ठेवता सरळ प्रश्न केला
“मला एखाद्या एजन्टचा नंबर दे”
“एजन्ट? अरे या कामसठी तुला एजन्ट कशाला हवाय?” मी जरा चिडुनच बोललो.
“म्हणजे हे काम तु स्वतां केले?” मीत्राने अगदी मी दुपारी १ ते ४ च्या वेळेत चीतळे बंधु कडुन बाकरवडी विकत घेण्याइतके अशक्य काम केल्याचे आश्चर्य करुन विचारले.

मला हल्ली खरच कळत नाही आज-काल लोकांना प्रत्तेक गोष्टीसाठी एजन्ट का लागतो?
मान्य आहे बरेच वेळेस वेळ नसतो, गोष्टी लवकर हव्या असतात, पण नेहमीच असे असते असे नाही. बरेच वेळेस तर मला वाटते की लोकांना सरकारी कामांबद्दलची प्रक्रिया माहीती नसते, शिवाय ती जाणुन घ्यायची नसते 😦 त्यामुळे उठ-सुट एजन्ट शोधा आणि यामेळेच त्यांचे फ़ावते.
एजन्ट लोक वाट्टेल ती फ़ी मागतात. जे काम सहज होऊ शकते त्यासाठी लोक उगीचेच या एजन्ट चा खिसा गरम करतात.
पुण्यात तर या एजन्ट लोकांनी उच्छाद मांडलाय नुसता. भाड्याने घर घेण्यासाठी तर हे लोक कळस करतात. मागे मी एकदा घर भाड्याने घेण्यासाठी शोधत होतो. बरेच लोकांनी सल्ला दीला के “अरे, एजन्टच्या मदतीने लवकर घर मिळेल..थोडे पैशे जातात पण तुला घाई आहे तर लगेच मिळेल घर”
म्हटल आपल घोड अडलय तर चला धरावे पाय एजन्टचे (इथे मला जे म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले असेलच). मी एकाला फ़ोन केला तर साहेबांनी ३-४ घर असल्याचे सांगितले. ते मलाच बघवे लागणार होते, शिवाय तो मालकाशी भाडे/डीपाँझीट कमी करण्याबाबत काहिच मदत करणार नाही. मी विचारले “तुमच्या फ़ी चे काय? ”
तर साहेबांनी लिस्ट्च सुरु केली.
“दोन महीन्याचे भाडे, स्टाँम्प पेपरची पैसे वेगळे. पेपर तुम्हाला आणावा लागेल.” मी मनात म्हटले हो..तुझा हुन्ड्यात द्यायचे राहिले होते ना.
“जर एक वर्षानंतर नविन करार करायचा असेल तर मला एक महिन्याचे भाडे द्यावे लागेल.” मी विचारले “तुम्ही मला घर दखवण्यापलीकडे काहीही मदत करत नाही आहत..तर मग हे नविन करारचे पैसे का?”
“साहेब, असेच असते ते..तुम्हाला पहिजे की नाही ते बोला?”
मी कपाळाला हात लावला आणि फ़ोन ठेवला. ईतके करण्यापेक्षा मी माझ्या रहात्या घरात ५०० रुपये भाडे वाठउन राहीलो तर मला स्वस्त पडेल. 🙂

हे असे सुरु असते, तरी सगळे याला डोळे झाकुन बळी पडतात. थोडा त्रास घ्यावा लागतो पण ही छोटी-मोठी कामे सहज शक्य आहेत.
हे जर असेच सुरु राहिले तर, बापाच्या शेवटच्या विधीसाठी सुद्धा एजन्ट शोधणारी माणसे दिसतील.

Advertisements

अश्रूंची ठेच…

Posted: सप्टेंबर 26, 2010 in अनूभव.., आठवणी..!!
टॅगस्

fathersonरात्रीचे ११:०० वाजले होते. मी नेहमी प्रमाणे माझया खोलीत अभ्यास करत होतो. बाबा बैठकीतल्या पलंगावर पहुडले होते. आई नुकतेच तिचे स्वैपाक घरातले काम आटपून खाटेवर पडली होती. मी अभ्यासात गुंग होतो. बाहेर कुणाचे तरी हुंदके ऐकू येत होते. मला पहिले वाटले की मला भास झाला असावा. थोड्या वेळाने आईची हाक ऐकु आली.

“प्रसाद…प्रसाद…अरे हे बघ ना कसे करताय”

मला पहिले कळलेच नाही काय झाले आहे ते. बाबांना नेहमी पित्ताचा त्रास होत असतो. मला वाटले की आज पुन्हा काही त्रास होतोय, म्हणून मी लगेच बैठकीत धाव घेतली.

मी बैठकीतले दृश्य बघून हबकलोच. बाबा, एकदम कडक, खंभीर स्वभावाचे, ते सोबत असताना कशाचीच भीती वाटायची नाही, ते बाबा आज लहान मुलासारखे हतबल होऊन रडता आहेत.

“मी मुलांसाठी काहीच करू शकलो नाही…मी आयुष्यात तुलाही कधी काहीच सुख देऊ शकलो नाही..मुलांची हौस-मौज नाही की काही नाही..” बाबा आईजवळ आपल्या मनातला बांध फोडून रडत होते. आईला काय करावे काही सुचत नव्हते. ती मला आणि बहिणीला हाका मारून बोलावत होती.

“अहो..असे काय करताय..शांत व्हा..सगळे ठीक होईल..सगळं चांगलेच तर चालले आहे..तुम्ही असे धीर सोडू नका..”

गरिबी, पैसा माणसाला इतका हतबल करू शकतो? पैसा हा माणसाच्या जिवापेक्षा मोठा झाला आहे?..आमची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाबांची सरकारी नोकरी, पगारात जेमतेम भागात होते. आई शिवणकाम, कुकिंग क्लासेस वैगरे करून हातभार लावत होती. मोठ्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा होतो. शिवाय दुसर्‍या बहिणीचे लग्न, माझया शिक्षणाचा खर्च, हे होतच की. बाबांच्या मनावरील ताण बरेच दिवस झाले जाणवत होता. तो ज्वालामुखी आज फुटला होता.

“प्रसाद..जा तर शेजारच्या काका ना बोलाव…”. आईच्या या वाक्याने मी भानावर आलो. मला अक्षर:हा काय करावे ते कळत नव्हते. मी तिथे दगडा प्रमाणे उभा होतो. माझया लहान वयाला हे सगळे कळण्याच्या पलीकडे होते. मला बाबांजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. मी जाण्याचा प्रयत्न करत होतो पण, मला असे वाटत होते की माझे पाय जमिनीत खोलवर रोवळ्या गेले आहेत.

मी कशीबशी हिंमत करून बाबाजवळ गेलो. बाबांचा हात हातात घेतला. त्यांना धीर देत म्हटले, “बाबा तुम्ही शांत व्हा..तुम्ही उगाचीच काळजी करता आहात..सगळं ठीक होणार”.

आम्ही सगळे बाबांची समजूत काढत होतो. काही वेळाने ते वादळ शांत झाले. मला बाबांचा खूप राग यायचा जेव्हा मी मागितलेली गोष्ट बाबा नाकारायचे, पण त्या दिवसा पासून मला कधी बाबांकडे हट्ट करावासा वाटळाच नाही. ते म्हणतात ना “दगडाची ठेच” माणसाला शहाणं करते ते. तशीच त्या दिवशीची ती “अश्रूंची ठेच” मला शहाणं करून गेली. त्या दिवशी त्या अश्रूंनी मला एक नवी हिंमत दिली. आज मी जे काही आहे ते त्या दिवशी जो धडा मिळाला त्यामुळेच.

आजही तो क्षण आठवला की अंगावर काटे येतात. मनात अनेक प्रश्न येतात बाबांच्या मनात नेमके काय चालले असेलत तेव्हा? त्यावेळी त्यांच्या मनात टोकाचे विचार आले असतील का? आज “झिंग चिक झिंग..” सिनेमा पाहताना तो क्षण पुन्हा डोळ्यासमोरून गेला. सिनेमात एका गरीब शेतकऱ्याची कहाणी अगदी मनाला पिळून जाते. शेतकऱ्यासाठी हे सरकारचे एका लाखाचे अनुदान आत्महत्या थांबवण्यासाठी आहे की त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रोस्साहन देतेय हेच कळत नाही.

आता डोळे जड झाले आहेत..पुढे काहीच लिहू शकत नाही….

पदवी कॉल्ड “बाबा”..

ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो शेवटी ३ सप्टेंबरला तो दिवस उजाडला. मी “बाबा” झालो. एका गोंडस जीवाने या धरतीवर आपल्या आगमना प्रीत्यर्थ “ट्याट्या” फोडून मला आणि सौला अनुक्रमे “बाबा” आणि “आई” अशा पदव्या बहाल केल्या.

मातीचा गणपती उठला आणि जिवंत मूर्ती घरात आली. सगळे अगदी खूश होते. माझ्या आई-बाबांना तर आभाळ ठेंगणे झाले होते. सगळ्या आप्त-सकीयांचे फोन येण्यास सुरुवात झाली.

“Congrats!! “.. “Hearly congratulations!! ” वैगरे वैगरे.

बऱ्याचं लोकांचा एक कॉमनं प्रश्न असायचा.. “मग आता काय बदल जाणवतोय? “..

“बराच.. पुण्याला बिलकुल पाऊस नाही हो.. आणि मुंबईत बघाना कसा धो-धो पडतोय”.. मी आपला निरागस उत्तर देत होतो.

“अहो.. तसे नाही हो.. बाबा झालात ना तुम्ही मग.. काय बदल वाटतोय? ”

आता या सद्ग्रुहस्ताला कोणीतरी बाबा झाले की दोन छोटीशी शिंग फुटतात किंवा अचानक केस पांढरे होतात किंवा मिशा येतात असे काही तरी सांगितले असावे. म्हणून २-३ वेळा विचारून खातरी करत असावे. आता मला सांगा मुलगा होऊन जेमतेम १-२ दिवस झालेले, त्यात असा कुठला बदल जाणवणार आहे हो?.. असो

आता या प्रश्नावर विचार केल्यावर असे वाटते की खरंच, काय बदल अपेक्षीत असला पाहिजे? चेहऱ्यावर ४० वर्षे जजची खुर्ची सांभाळून रिटायर्ड झाल्या सारखा गंभीर चेहरा करावा की आहे तसंच हसत खेळत राहावे.

माझ्यामते तर मला माझे बालपण या चिमुकल्या बरोबर पुन्हा जगायला आवडेल. बघूया कितपत जमतेय ते.. 🙂

कार चालक प्रशिक्षण – एक छळ..

भारतात आल्या-आल्या काय जोष चढला होता काय माहिती पण कार घेण्याचे भूत माझ्या मनात थैमान घालते होते… (काय आहे बँकेत जरा जास्त पैसे दिसतं असले की त्याला वाट फोडण्याचे असे खूळ माझ्या मनात आलेच म्हणून समजा.. ) तर पहिली पायरी म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायचे ठरवले व नोंदणी केली.

प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता आणि त्या प्रशिक्षकाने मला माझ्या संपूर्ण शालेय जीवनात कोणी झापलं नसेल असे धडे(झापले) दिले. मी आपला अमेरिकेचा जवळ-जवळ २०००-२५०० माईल्स कार चालवण्याचा अनुभव चेहऱ्यावर मिरवतं कारमध्ये बसलो. मी आणि अजून एक आजोबा आणि एक तरुणी (बहुतेक तिला तिच्या वडिलांनी “तुला तुझ्या पुढच्या वाढदिवसाला कार घेऊन देणार” असे आश्वासन दिले असणार.. असले बाबा आम्हाला का बरं नाही मिळाले.. 😦 असो)

प्रथम आजोबांनी कारचा ताबा घेतला.. बहुतेक सीनियर सिटीजनाच नियम येथे सुद्धा लागू होतो असा त्यांचा समज असावा कारण ‘त्या’ तरुणीने जेव्हा प्रथम ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजोबांनी जो कटाक्ष टाकला त्यामुळे ती सुद्धा बिचकली. एक तर सकाळची ऑफिसची वेळ त्यामुळे ट्रॅफिक अपनी पुरी जवानी पे था आणि दुसरे म्हणजे नेहमी प्रमाणे रस्त्याचे काम सुरू होते त्यामुळे आणखीन कोंडी होत होती आणि आजोबा आपल्या तरुण पणीचे दिवस आठवतं तो एक्सलेटर पूर्णं जोर लावून दाबत होते. त्यांचा चेहरा बघून तो जोर “दुसरी” कडे पडून काही भलतेच होईल का अशी शंका वाटत होती 🙂 आजोबा पूर्णतः गडबडले होते कारण इतका एक्सलेटर दाबूनही ही गाडी पुढे का जात नाही.

“काय करताय पहिले गेयर तर टाका. ” तुसडेपणा या शब्दाचा पुरेपूर समर्थन करीत त्या प्रशिक्षकाने आपला दिवस सुरू झाल्याची ग्वाही दिली.

“अहो.. काय करताय.. नीट बघा.. वळवा ना.. अरे गेयर बदला ना.. ” असे एक ना दोन पाणउतारा करणारे घोषवाक्य म्हणत तो आम्हाला शिकवत (??? ) होता. मग आजोबांचे खेळणे झाल्यावर “त्या” तरुणीने गाडीचा ताबा घेतला. मी असतील-नसतील तेव्हड्या देवांना साकडं घातले (एक कोणीतरी येईलच वाचवायला).

तिने बसल्या-बसल्या पहिले हॉर्न वाजवला. मला वाटले की ती तपासून बघत असेल. पण नंतर पूर्णवेळ ती त्या हॉर्नवरच बसली होती. तिला बहुतेक घरून सांगितले असेल “बेटा.. दर २-३ सेकंदाने हॉर्न वाजवायचा”. मी अमेरिकेतले दिवस आठवत होतो.. तिथे खरंतर हॉर्न हा गाडीचा ऑप्शनल पार्ट असतो… असो 🙂

मग शेवटी माझी वेळ आली. मी आपला आपल्याला गाडी येते या तोऱ्यात बसलो. गाडी चालू केली आणि एक्सलेटर दाबला. पण हे काय? गाडी पुढे का जात नाही? मग प्रशिक्षकाने गोड आवाजात “अहो.. गेयर तर टाका. नुसते एक्सलेटर काय दाबताय. “वैगरे बोलून माझा उद्धार सुरू केला. मी आपला अरे हो खरंच की वैगरे बोललो आणि गेयर टाकायला गेलो तर.. “ख्खरखर्ख्र” असा विचित्र आवाज येत होता. मग तो प्रशिक्षक जाम चिडला व कुठून-कुठून लोक गाडी शिकायला येतात असला “लुक” देत गेयर टाकला.

मग मी त्या जत्रेरुपी रोड(??? काही केल्या दिसतं नव्हता) वर निघालो. डावीकडून, उजवीकडून मागून पुढून (अवचोर ध्वातात – अर्थात चारही दिशांनी) सगळीकडून बाइक, कार, सायकल, पादचारी, गाय, म्हॅस (ह्या शेवटच्या दोन वाहनांवर कोणी बसले नव्हते 🙂 ) असे विविध वाहने येत होती. मला तर वाटत होते की अजून काही वेळात गाडी वरून सुद्धा काही वाहने निघतील. तो प्रशिक्षक सारखा माझ्या अंगावर खेकसत होता “अरे.. गाडी चालवा.. वेग वाढवा” मी मात्र पूर्णतः गडबडलो होतो. साला जागा कुठे आहे गाडी जायला.

शेवटी हो-नाही करत एकदाचा माझा क्लास संपला(एकदाचा). नंतरच्या क्लास मध्ये मी त्या प्रशिक्षकाला कधीच सांगितले नाही की मला गाडी येते म्हणून.. 😦

या २३ तारखेला आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्णं झालीत की हो… पण आम्ही दोघे अजून एकत्र मिळून साजराच करू शकलो नाही. म्हणजे बघा २००८ मध्ये पहिला वाढदिवस तेव्हा मी नुकताच एकटा अमेरिकेला आलो होतो आणि आता वापस जातो आहे तो पण ३० तारखेला.. म्हणजे हा पण हुकला. बायको तशी काही तक्रार करत नाही पण ह्याची व्याजासकट भरपाई करावी लागणार आहे हे नक्की.. 🙂 तशी ती आपणहून काही मागणार नाही.. पण काय आहे भविष्यातील युद्धात (युद्ध = एखादी महागडी, कधीही कामी न येणारी वस्तू मागणे ) वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दरुपी शस्त्रात ह्या शस्त्राची भर पडायला नको.
“हो!! मी कधी काही मागितले आहे का तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला? आता ही एकच गोष्ट मागते आहे ना.. ” असो

आत्ता बायकोला फोन केला तर “कोण आहे?? ” या टिपीकल पुणेरी स्वागत वाक्याने आमचा फोन घेतल्या गेला शिवाय “काय बाई लोक असतात.. रात्री-अपरात्री फोन करतात” हे फोन करण्याला ऐकू जाईल अशा स्वरात पुटपुटली. तिचे पण काही चूक नाही म्हणा. एकतर हा दिवस मला लक्षात राहील असा पुसटसाही विचार तीच्या मनात डोकावला नसेल (मोबाईल रिमाइंडर की जय!!! ) आणि मॅडम एकदा झोपल्या की बस!! लेडी-कुंभकर्ण आहे. 🙂 त्यात तिने रात्री १२:०० वाजता फोन घेतला हेच माझे भाग्य.

लग्नाला २ वर्षे पूर्णं झाले असले तरी अजून आमचा जेमतेम एखादं वर्षाचा संसार झाला असेल. त्यामुळे “चार लाईना” लिहीण्या इतपत अनुभव गाठीशी जमा झालेला नाही. तरी या एका वर्षात बरेच उतार-चढाव आलेत. “मुझे तुम याद करना ऑर मुझको याद आना तुम.. ” आणि “तुमसे जुदा होकर.. ” वैगरे गाणीपण झालीत. प्रेमरस, विरहरस, ध्वंदरस वैगरे रसपण झालेत.

बायकोतर्फे “भावनाशून्य दगड” ही उपाधी मला लग्नाच्या २-३ महीन्या नंतरच बहाल करण्यात आली आहे त्यामुळे जास्त काही लिहीत नाही. हो पण बायकोला एकच सांगावेसे वाटते आतापर्यंत जशी माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिलीस तशीच पुढेही राहा. आतापर्यंत समोर येईल त्या सुखद व दुःखद क्षणांना माझ्या सोबत हसत मुखाने सामोरे गेलीस तशीच कायम राहा… कारण तूच माझी शक्ती आहेस.. 🙂

आता इथेच थांबतो.. बायको साता समुद्रापलीकडे असल्यावर शब्दही सुचत नाही हो..

Fabulous Las Vegas..भाग् – १

दुसरा दिवस:

५-६ तासांचे ड्रायव्हिंग आणि दिवसभराचा थकवा, यामुळे उठायला थोडा उशीर झाला. आम्ही सगळे ७:३० पर्यंत तयार झालो. चलो-चलो करण्यात ८:०० वाजले. लिफ्टमध्ये जाताना थोडी शंका आली होतीच की आपण South rim Grand canyon national park चा पत्ता घेतला की नाही. सहसा मी विसरत नाही पण या वेळेस जरा गडबड झालीच. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही ‘Sky-walk’ ला गेलो होतो त्यामुळे South rim चा पत्ता मला सुद्धा माहिती नव्हता. (बरं झालं बायको नव्हती सोबत नाहीतर.. ‘आमचे हे जरा धांध्रटच आहेत’ ही समज अजून पक्की झाली असती आणि पुरावा सुद्धा मिळाला असता.. असो) आता काहीतरी मार्ग काढणे भाग होते कारण येथे मध्येच थांबून ‘भैय्या.. ये Grand canyon national park किधरकू पडता है? ‘ असे विचारता ही नसते आले.. खरं तर तसे तो रस्ता पुर्णपणे डेझर्ट मधूनंच जातो त्यामुळे विचारायला आम्हाला ‘गोरे कुत्रं’ सुद्धा सापडले नसते. (अमेरिकेत आहे म्हणून काळ्याच्या ऐवजी गोरा म्हटले) मग एक-दोन मित्रांना फोन करून पत्ता शोधून काढला आणि हे मित्र ऐन वेळी चुकीचा पत्ता देऊन कुठलीही ‘पुरानी दुश्मनी’ वैगरे काढणार नाहीत असे मनाला पटवले आणि देवाचे नाव घेऊन आम्ही निघालो. हे सगळं करता करता आम्हाला ९:४५- १०:०० झाले.

ऊन बरंच वाढलं होत. ‘मामा’ (ट्रॅफिक कॉप) ची नजर चुकवत, कधी जोरात कधी स्पीड लिमीट मध्ये चालवत आम्ही चाललो होतो. एक तर US-93 हा फ्री-वे अगदी सुता सारखा सरळ आहे. अगदी तुम्ही मध्ये एखादी डुलकी जरी घेतली तरी कोणाला कळणार नाही. कुठे म्हणजे अगदी कुठेच त्याला वळण नाही, शिवाय ट्रॅफिकही नव्हत, त्यामुळे गाडी १०० माइल्स/आवर अगदी सहज टच होत होती. मजा येत होती आणि जोडीला हिमेस भाई होतेच. थिरू अण्णाची मात्र हाल होत होते. त्याला हिंदीतले एक अक्षरही कळत नाही आणि त्यावर आम्ही दोघे गळे फाडून गात होतो :-). मग जवळ-जवळ २७९ माईलस चालवल्यावर South rim Grand canyon national park चे बोर्ड दिसायला लागले. बघितले तर भली मोठी रांग एंट्रीसाठी. एक बरं असते इथे, बहुदा ते एंट्री कारमध्ये बसूनच होते, उगाच रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नाही. आम्ही सुद्धा प्रत्तेक भारतीयांन प्रमाणे एंट्री फी किती आहे हे शोधू लागलो. $२५ पर कार.. च्यायला फार महाग होत. पण आता इतके ड्रायव्हकेल्यावर तसेच परत जाण्यात काही अर्थ नव्हता. हे सगळे करेस्तोवर आम्हाला २. ३०-३:०० वाजले होते. तिकीट घेऊन आम्ही गाडी पार्क केली आणि तिकिटासोबत दिलेले मॅप्स पाहू लागलो. एक-दोन स्पॉट बघून निघूया असे ठरले. पण जेव्हा आम्ही पहिल्या स्पॉटवर पोहोचलो.. ‘सही!!!!.. ‘ आम्ही अक्षरश: स्तब्ध झालो. काय नजारा होता तो.. आहा!!!.. असे वाटत होते की आम्ही भल्यामोठ्या पेंटिंग किंवा फोटो समोर उभे आहोत. आम्ही अचानक समुद्र सपाटी पासून ७००० feet/२१३४ m वरती उभे होतो आणि विशेष म्हणजे येथे फक्त काही ठिकाणीच कुंपण केले आहे बाकीचा बराचसा भाग हा सताड उघडा आहे. म्हणजे तुमची जरा जरी नजर चुकली तर सरळ कोलोराडो नदीत अंघोळ करायला ७००० फिट खोल दरीत जाल. (अधिक तांत्रिक माहितीसाठी http://www.nps.gov/archive/grca/grandcanyon/south-rim/index.htm येथे टिचकी मारा). आम्ही सगळे तो देखवा पाहून भारावून गेलो. ते नजारे बघून सगळा ड्रायव्हिंगचा क्षीण निघून गेला. वापस जायचा मूडच होत नव्हता. पण पुन्हा ५-५:३० तासाचे ड्रायव्हिंग मला एकट्यालाच करायचे होते आणि तसे आज रात्रीचा प्रोग्रॅम जरा वेगळा 🙂 असल्याने आम्हाला लवकर निघणे भाग होते. १-१:३० तासात आम्ही पाय काठता घेतला. निघालो तेव्हा चांगलेच आभाळ आले होते. १०-१५ मिनिटांतच पाऊस सुरू झाला.. चक्क गारा पडत होत्या. 🙂 बघता-बघता आजू-बाजूला स्नो जमू लागला… एकदम सही!!.. मजा येत होती. पाच-दहा मिनिटांतच पुन्हा वातावरण बदलले आणि पुन्हा ती जीवघेणी गर्मी सुरू झाली. शेवटी लाँग ड्राइव्ह नंतर ९ वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो.

एव्हडे ८-९ तास ड्रायव्हिंग केल्यानंतर मला बिलकुल इच्छा नव्हती कुठे बाहेर जाण्याची पण आमचा थीरू अण्णा अगदी पेटला होता.. ‘वुयी मस्ट गो टु स्ट्रीप क्लब इन लास वेगास’. तसा आमचा थीरू अण्णा अगदी शांत आणि गुणी मुलगा, पण लास वेगास ला आल्यापासून साहेबांचा रंगच बदलला होता. आमच्या तिघांनधे तोच बॅचलर होता. ‘नो यार.. चुम्मा वुयी वील सी’.. (घाबरू नका तमिळ मध्ये चुम्मा याचा अर्थ ‘सहजच’ असा होतो… मी सुरवातीला जेव्हा बंगलोराला होतो तेव्हा एका मुलीच्या तोंडून हा शब्द ऐकून असाच अवाक झालो होतो. एक वेगळा पोस्ट लिहील यावर कधीतरी).. तर त्याच्या आग्रहा खातर आम्ही सगळे तयार झालो. मागच्या वेळेस बायको सोबत आलो होतो त्यामुळे प्रश्नच नव्हता. या वेळेस आम्ही दोघे ‘आम्ही नाही हा त्यातले.. ‘ ‘आम्हाला मुळी रसच नाही त्यात’ असली काहीशी भूमिका घेतली होती.. (खरं सांगायचे तर मनात सारखी धास्ती होती… नेमके आम्ही तेथे जावे आणि बायकोच्या माहेरच म्हणा किंवा तिची फॉरेनला सेट झालेली एखादी मैत्रीण आम्हाला बाहेर पडताना बघावी… असो. )

मग शेवटी सच्चा मित्र म्हणून आणि केवळ आमच्या थीरू अण्णाची इच्छा 🙂 म्हणून आम्ही इच्छित स्थळी जाऊन आलो.

Grand Canyon

क्रमशः

fabulous las vegas

fabulous las vegas

बायको जेव्हा डिसेंबर’०८ मध्ये यू. एस. ए. ला आली होती, तेव्हा आम्ही कॅलिफोर्निया चा बराच भाग पिंजून काढला होता. Las Vegas ला सुद्धा जाऊन आलो होतो. पण Las Vegas अशी जादुई दुनिया आहे की तुम्हाला पुन्हा-पुन्हा जावेसे वाटते.

२५ मे ला मेमोरियल डे ची सुट्टी होतीच, लॉग वीकएंड असल्यामुळे कुठेतरी भटकायला जायचेच होते आणि शिवाय माझ्या नवीन रूममेट्स, अमित आणि थीरू अण्णा ला Las Vegas बघायचं हौस होती. थीरू अण्णा ची वेगळीच गंमत आहे. ‘थीरू हे त्याच्या नावाचे शॉर्ट च्याही शॉर्ट नाव आहे. त्याचे खरे नाव ”थीरुमणीसेल्वण थिरुणावुक्कारसू’ असे आहे. अमेरिकन लो़कांचीतर मला फार कीव येते. इथे कुठल्याही कस्टमर केयर मध्ये फोन केला की पहिले तुमचे नाव विचारतात. आता त्यांचा ह्या नियमामुळे त्यांना इतक्या जीवघेण्या दिव्यातून जावे लागत असेल. थिरू अण्णा जेव्हापण फोन करतो तेव्हा पहिले १०-१५ मिनिटे हे नुसते नाव सांगण्यात जातो. हा आपल्या टिपीकल दाक्षिणात्य शैलीत नावाचे स्पेलिंग सांगणे सुरू करतो.. ‘टी’.. ‘एहेच'(हे लोक एच ला ‘एहेच’ म्हणतात 🙂 )……. आम्ही मात्र पोट धरून हसत असतो.. असो. विषय भटकतो आहे.

तर इथं हे एक बरं असते.. सुट्टी ही नेहमी वीकएंडला लागूनच असते. आपल्या सारखी तिथी-वीथी च्या भानगडीत हे लोक पडतच नाही)मग काय ठरवलं trip to Las Vegas. विशेष म्हणजे या खेपेला मी bachelor या नात्याने Las Vegas ला जाणार होतो. 🙂

एक आठवडा आधीच आखणीला(म्हणजे मराठीत planning) सुरुवात केली. हॉटेल बुकिंग, भाड्याची कार वैगरे महत्त्वाच्या गोष्टी पार पाडल्या.Las Vegas म्हणजे night life, मग दीवसा काय करायचे? यावर चर्चा झाली.Grand Canyon आणि Madame Tussaud’s Wax Museum (आम्ही गमतीत याला “तुसडी” Madam म्हणून संभोदीत होतो)या दोन गोष्टी पाहायचे ठरले.

पाहिला दिवस:
शुक्रवारी office मधून जरा लवकर म्हणजे ४ वाजता निघालो.Airport वरून rental car घेतली(त्यांनी GPS साठी आमची बरीच लूट केली.. पण काय करणार इथे GPS असला की प्रवास अगदीच सोपा होतो.. म्हणून मग मुकं गिळून घ्यावा लागला.. ते म्हणतात ना “अडला नारायण.. “.. असो)घरून निघे-निघेस्तोवर ५:३० झालेच आणि ज्याची भीती होती तेच झाले..traffic jam. 😦 एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते.. ती म्हणजे या लो़कांचा traffic sense. इथला traffic jam आणि भारतातला traffic jam यामध्ये जमीन-अस्मान चा फरक आहे (अथात मी हे छातीठोक पणे सांगू शकतो कारण मी पुण्यात bike चालवतो.. ).deadlock, honking, wrong side driving असले एकही प्रकार तुम्हाला दिसणार नाही. विशेष म्हणजे भारतीय सुद्धा सगळे नियम काटेकोरपणे पाळतात.. असो

अशा प्रसंगात तुमचा बेस्ट मित्र म्हणजे गाणं. गाडीत बसलो की पाहिले काम म्हणजे गाणे लावणे आणि मुक्त कंठाने गाणे.. हा माझा प्रवासातला आवडता उपक्रम(बाकीचे सगळे कान बंद करतात तो भाग वेगळा.. पण काय आहे.. तुमचे लक्ष दुसरीकडे लागले की प्रवासाचा त्रास होत नाही. अशा प्रकारे थांबत-थांबत आम्ही एकदाचे Las Vegas ला रात्री १:०० वाजता पोहचलो.

हॉटेल मध्ये बहुदा बरेचसे भारतीय दिसत होते. ते बघून मी जरा खूश झालो.. अहो.. भारतीय दिसलेत म्हणून नाही काही.. तर आपण सर्वात चांगली आणि स्वस्त deal मिळवली आहे याचा आनंद फार झाला. कारण अमेरिकेतील बहुतेक प्रत्तेक भारतीय प्रथम स्वस्त डील शोधून काठतो. प्रत्तेक भारतीयाच्या मते स्वस्त डील शोधणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे असे मानून चालतो. आधीच खूप उशीर झाला होता त्यामुळे रूम मध्ये गेल्या-गेल्या सगळे झोपलो.

Fabulous Las Vegas..भाग् – 2