Archive for the ‘आठवणी..!!’ Category

सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन, “मी नाही अभ्यास केला…” मुळ (ओरिजीनल चा मराठी समानार्थी शब्द बरेच वेळ विचार करुन मीळाला 😦 ) बालगीत खाली नमुद करतो आहे.

“मी नाही अभ्यास केला…” – ओरिजीनल…
—————————————————

घड्याळ्यात वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले दोन
बाबाचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले तिन
ताईची हरवली पीन
पीन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले चार
आईने दीला मार
मार खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले पाच
ताईने केला नाच
नाच भघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले सहा
आईने केला चहा
चहा पीण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले आठ
बाबानी आणला माठ
माठ पहाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले नऊ
घरात आली माऊ
माऊशी खेलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

घड्याळ्यात वाजले दहा
पाहुणे आले पहा
पाहुण्याशी बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

Advertisements

अश्रूंची ठेच…

Posted: सप्टेंबर 26, 2010 in अनूभव.., आठवणी..!!
टॅगस्

fathersonरात्रीचे ११:०० वाजले होते. मी नेहमी प्रमाणे माझया खोलीत अभ्यास करत होतो. बाबा बैठकीतल्या पलंगावर पहुडले होते. आई नुकतेच तिचे स्वैपाक घरातले काम आटपून खाटेवर पडली होती. मी अभ्यासात गुंग होतो. बाहेर कुणाचे तरी हुंदके ऐकू येत होते. मला पहिले वाटले की मला भास झाला असावा. थोड्या वेळाने आईची हाक ऐकु आली.

“प्रसाद…प्रसाद…अरे हे बघ ना कसे करताय”

मला पहिले कळलेच नाही काय झाले आहे ते. बाबांना नेहमी पित्ताचा त्रास होत असतो. मला वाटले की आज पुन्हा काही त्रास होतोय, म्हणून मी लगेच बैठकीत धाव घेतली.

मी बैठकीतले दृश्य बघून हबकलोच. बाबा, एकदम कडक, खंभीर स्वभावाचे, ते सोबत असताना कशाचीच भीती वाटायची नाही, ते बाबा आज लहान मुलासारखे हतबल होऊन रडता आहेत.

“मी मुलांसाठी काहीच करू शकलो नाही…मी आयुष्यात तुलाही कधी काहीच सुख देऊ शकलो नाही..मुलांची हौस-मौज नाही की काही नाही..” बाबा आईजवळ आपल्या मनातला बांध फोडून रडत होते. आईला काय करावे काही सुचत नव्हते. ती मला आणि बहिणीला हाका मारून बोलावत होती.

“अहो..असे काय करताय..शांत व्हा..सगळे ठीक होईल..सगळं चांगलेच तर चालले आहे..तुम्ही असे धीर सोडू नका..”

गरिबी, पैसा माणसाला इतका हतबल करू शकतो? पैसा हा माणसाच्या जिवापेक्षा मोठा झाला आहे?..आमची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाबांची सरकारी नोकरी, पगारात जेमतेम भागात होते. आई शिवणकाम, कुकिंग क्लासेस वैगरे करून हातभार लावत होती. मोठ्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा होतो. शिवाय दुसर्‍या बहिणीचे लग्न, माझया शिक्षणाचा खर्च, हे होतच की. बाबांच्या मनावरील ताण बरेच दिवस झाले जाणवत होता. तो ज्वालामुखी आज फुटला होता.

“प्रसाद..जा तर शेजारच्या काका ना बोलाव…”. आईच्या या वाक्याने मी भानावर आलो. मला अक्षर:हा काय करावे ते कळत नव्हते. मी तिथे दगडा प्रमाणे उभा होतो. माझया लहान वयाला हे सगळे कळण्याच्या पलीकडे होते. मला बाबांजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. मी जाण्याचा प्रयत्न करत होतो पण, मला असे वाटत होते की माझे पाय जमिनीत खोलवर रोवळ्या गेले आहेत.

मी कशीबशी हिंमत करून बाबाजवळ गेलो. बाबांचा हात हातात घेतला. त्यांना धीर देत म्हटले, “बाबा तुम्ही शांत व्हा..तुम्ही उगाचीच काळजी करता आहात..सगळं ठीक होणार”.

आम्ही सगळे बाबांची समजूत काढत होतो. काही वेळाने ते वादळ शांत झाले. मला बाबांचा खूप राग यायचा जेव्हा मी मागितलेली गोष्ट बाबा नाकारायचे, पण त्या दिवसा पासून मला कधी बाबांकडे हट्ट करावासा वाटळाच नाही. ते म्हणतात ना “दगडाची ठेच” माणसाला शहाणं करते ते. तशीच त्या दिवशीची ती “अश्रूंची ठेच” मला शहाणं करून गेली. त्या दिवशी त्या अश्रूंनी मला एक नवी हिंमत दिली. आज मी जे काही आहे ते त्या दिवशी जो धडा मिळाला त्यामुळेच.

आजही तो क्षण आठवला की अंगावर काटे येतात. मनात अनेक प्रश्न येतात बाबांच्या मनात नेमके काय चालले असेलत तेव्हा? त्यावेळी त्यांच्या मनात टोकाचे विचार आले असतील का? आज “झिंग चिक झिंग..” सिनेमा पाहताना तो क्षण पुन्हा डोळ्यासमोरून गेला. सिनेमात एका गरीब शेतकऱ्याची कहाणी अगदी मनाला पिळून जाते. शेतकऱ्यासाठी हे सरकारचे एका लाखाचे अनुदान आत्महत्या थांबवण्यासाठी आहे की त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रोस्साहन देतेय हेच कळत नाही.

आता डोळे जड झाले आहेत..पुढे काहीच लिहू शकत नाही….

कंदील लाईट डीनर

कंदील लाईट डीनर

त्याचे झाले असे की, आम्ही सगळे हॉल मध्ये टी. वाही. समोर रात्री जेवायला बसलो असताना नेमके लाइट गेले. सिरीयाला बघताना सगळ्यांची छान तंद्री लागली होती आणि अशा अचानक व्यत्ययामुळे सगळ्यांचा मूड गेला.
मग मेणबत्त्यांची शोधा-शोध झाली. आजकाल मेणबत्ती ही पूर्वी सारखी ऑप्शनल वस्तू न राहता लोड-शेडिंगमुळे गरजेची होऊन बसली आहे. एक वेळा चहापत्ती घ्यायला विसरा पण मेणबत्ती विसरू नका.

यावरून मग जुन्या गोष्टी निघाल्या. आम्ही जेव्हा बुलढाण्याला होतो तेव्हा आमच्याकडे लाइट नव्हते. कंदील, चिमण्या(हा एक दिव्याचा प्रकार आहे 🙂 ), मेणबत्त्या हे तेव्हाचे आमचे उजेडाचे सामान होते. त्यावेळी ‘दिवेलावणी ची वेळ’ ही एक वेळ होती आणि कामही होते.

वात, रॉकेल, कंदिलाची काच वैगरे प्रकार आणायला घरात माझीच निवड होत असे. केरोसिन किंवा ‘मिटी का तेल’ हे एक वेळ समजू शकते पण रॉकेल ही काय भानगड आहे हे काही मला अजूनही कळले नाही. बहुतेक रॉकेल हा ‘रॉक ऑइल’ या शब्दाचा अपभ्रंश असावा. त्या वेळेला या केरोसिनच्या गाड्या फिरत असत. त्यावर इंग्लिशमध्ये केरोसिन लिहिलेले असायचे. मजा म्हणजे प्रत्येक गाडीवर वेग-वेगळे स्पेलिंग असायचे. ‘kerosene’, ‘kerosine’. एका गाडीवर तर चक्क केरोसिनचे ‘keroseen’ असे लिहिले होते. लहानपणी तर मला असे वाटायचे की ‘मिटी का तेल’ म्हणजे माती जोरात दाबली की तेल निघते. गंमत म्हणजे एक-दोनदा मी हा प्रकार करूनही बघितला होता.

आमचे रोजचे डिनर हे ‘कंदील लाइट डिनर’ असायचे. त्यावेळी जेवायला पाने घेणे हे एक काम असायचे. आता कसे ज्याला वाटेल तो एक डीश उचलतो आणि टी. वाही. समोर जेवायला बसतो. तर त्या वेळी सगळ्यांसाठी पाट घेणे. तेव्हा सहसा कोणाकडे डायनिंग टेबल नसायचे. सगळे खाली बसूनच जेवत असत. तर पाट घेणे, लोटी-भांडे भरून घेणे, ताट-वाट्या-पेले घेणे. अशी सगळी तयारी करावी लागे. सगळे कुटुंब गोलाकार करून जेवायला बसत असत आणि मध्यभागी का ‘कंदील’ असे. कोण कुठे बसणार ह्या जागा ठरलेल्या असायच्या. मग गप्पा-टप्पा, कोणाचा दिवस कसा गेला वैगरे आणि आग्रह पण होत असे रोजच्या जेवणात. आता तर गप्पा तर विसराच पण जेवण सुद्धा त्या टी. वाही. कडे पाहूनच होते.. असो

ह्या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना लाइट आले आणि आम्ही पुन्हा त्या टी. वाही. च्या आहारी जाऊन सिरीयाला बघण्यात गुंग झालो.

बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई संक्रांतीच्या हळदी-कुंकासाठी बाहेर गेली होती. तिला बराच वेळ लागणार होता कारण गल्लीतल्या ५-६ ठिकाणी कारेक्रम होता. घरी मी आणि बाबा. सहसा आईचा हळदी-कुंकाचा प्रोग्रॅम असला की मी घरीच असायचो.. ती घरी आली की पहिले मी त्या ओटी वर हल्ला करायचो.. ओटीतले बोरं, शेंगा, हरबरे, गाजर, ऊस शोधून खाण्यात वेगळीच मजा आहे. आमच्याकडे हळदी-कुंकू असले की आई मला बाहेर पिटाळायची… कारण ओटीतले निम्मे ऊस मीच फस्त करत असे. मला ऊस खूप आवडतो. तोही दातांनी सोलून. कोणी ऊसाचे छोटे-छोटे तुकडे केले की मला बिलकुल आवडतच नाही… बाबा आजही रवीवारी ऊस दिसला की न विसरता आणतातच… असो

घरी मी आणि बाबांच होतो.. दोघांनापण भूक लागली होती. मग बाबांनी सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. आमचे बाबा तसे उत्तम कुक. त्यांच्या हातची स्पेशल कचोरी म्हणजे माझी ऑल-टाइम फेवरेट. पण घाई-गडबडीत नेहमी काहीतरी गडबड होते आणि डीश बिघडते.. :-).

कीत्तेक वेळेस तर बाबांनी मसाल्याचा चहा करताना चहात चहा मसाला न टाकता ‘गरम मसाला’ टाकला आहे. मग सगळे खापर आईवर फोडल्या जाते..

” ही न नेहमी ते डबे इकडचे तिकडे करत असते.. त्यामुळे माझा गोंधळ होतो.. ” बाबा त्यांचे हे पेटेंट वाक्य बोलून फसलेल्या प्रयोगावर झाक घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

आता तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. मी ‘मसालेदार’ चहाचा पहिला घोट घेतल्यावर लगेच ओळखतो की आईने पुन्हा गरम मसाल्याची बाटली बदली म्हणून.. :-).

बरं चश्मा घालत जा म्हटले तर “हो!! मला काय धाड भरली आहे न दिसायला??.. ” असे उत्तर मिळते.

अशीच नेहमी सारखी गडबड करत बाबांनी रव्याच्या ऐवजी चक्क ज्वारीचे पीठ वापरले. त्या वेळेस आमच्या कडे लाइट नव्हते त्यामुळे कंदीलच्या प्रकाशात पटकन लक्षातपण आले नाही.

शिरा झाला की नाही पाहायला जेव्हा बाबांनी पाहीले तर ” हा असा चिकट-चिकट का वाटतोय??.. ” म्हणून खाऊन पाहिलं व तेव्हा लक्षात आले की बाबांनी नवीन पाककृतीचा शोध लावला आहे.. 🙂

बरं शिरा चांगला साजुक तुपात, काजू-कीशमीश घालून बनवला होता त्यामुळे फेकायची इच्छा होत नव्हती. मग काय.. त्या दिवशी डोळे बंद करून, पाण्यासोबत ढकलत खावा लागला.. 🙂

तेव्हापासून आईला कुठे बाहेर जायचे असले की काहीतरी बनवूनच जाते.. काय सांगता पुन्हा कुठला नवीन पदार्थ खावा लागेल.. 🙂

या २३ तारखेला आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्णं झालीत की हो… पण आम्ही दोघे अजून एकत्र मिळून साजराच करू शकलो नाही. म्हणजे बघा २००८ मध्ये पहिला वाढदिवस तेव्हा मी नुकताच एकटा अमेरिकेला आलो होतो आणि आता वापस जातो आहे तो पण ३० तारखेला.. म्हणजे हा पण हुकला. बायको तशी काही तक्रार करत नाही पण ह्याची व्याजासकट भरपाई करावी लागणार आहे हे नक्की.. 🙂 तशी ती आपणहून काही मागणार नाही.. पण काय आहे भविष्यातील युद्धात (युद्ध = एखादी महागडी, कधीही कामी न येणारी वस्तू मागणे ) वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दरुपी शस्त्रात ह्या शस्त्राची भर पडायला नको.
“हो!! मी कधी काही मागितले आहे का तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला? आता ही एकच गोष्ट मागते आहे ना.. ” असो

आत्ता बायकोला फोन केला तर “कोण आहे?? ” या टिपीकल पुणेरी स्वागत वाक्याने आमचा फोन घेतल्या गेला शिवाय “काय बाई लोक असतात.. रात्री-अपरात्री फोन करतात” हे फोन करण्याला ऐकू जाईल अशा स्वरात पुटपुटली. तिचे पण काही चूक नाही म्हणा. एकतर हा दिवस मला लक्षात राहील असा पुसटसाही विचार तीच्या मनात डोकावला नसेल (मोबाईल रिमाइंडर की जय!!! ) आणि मॅडम एकदा झोपल्या की बस!! लेडी-कुंभकर्ण आहे. 🙂 त्यात तिने रात्री १२:०० वाजता फोन घेतला हेच माझे भाग्य.

लग्नाला २ वर्षे पूर्णं झाले असले तरी अजून आमचा जेमतेम एखादं वर्षाचा संसार झाला असेल. त्यामुळे “चार लाईना” लिहीण्या इतपत अनुभव गाठीशी जमा झालेला नाही. तरी या एका वर्षात बरेच उतार-चढाव आलेत. “मुझे तुम याद करना ऑर मुझको याद आना तुम.. ” आणि “तुमसे जुदा होकर.. ” वैगरे गाणीपण झालीत. प्रेमरस, विरहरस, ध्वंदरस वैगरे रसपण झालेत.

बायकोतर्फे “भावनाशून्य दगड” ही उपाधी मला लग्नाच्या २-३ महीन्या नंतरच बहाल करण्यात आली आहे त्यामुळे जास्त काही लिहीत नाही. हो पण बायकोला एकच सांगावेसे वाटते आतापर्यंत जशी माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिलीस तशीच पुढेही राहा. आतापर्यंत समोर येईल त्या सुखद व दुःखद क्षणांना माझ्या सोबत हसत मुखाने सामोरे गेलीस तशीच कायम राहा… कारण तूच माझी शक्ती आहेस.. 🙂

आता इथेच थांबतो.. बायको साता समुद्रापलीकडे असल्यावर शब्दही सुचत नाही हो..

काल मी आय-पॉड चार्जींग केबल शोधत होतो… काही केल्या मिळत नव्हते.. सगळे घर ‘उथल-पुथल’ केले (‘अंदाज अपना अपना’ चा हा संवाद मला फार आवडतो.. असो) तर फार शोधल्यावर सापडत नव्हते. जवळ-जवळ १ तास शोधल्यावर शेवटी मी हार मानली व त्याचा पिच्छा सोडला.

आता इथे आई जर असती तर “तू डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” हा तिचा टिपीकल डायलॉग मारला असता.

आईचा हा एक भारी समज आहे. कुठलीही वस्तू तुम्हीजर डाव्या हाताने ठेवली तर ती सापडत नाही. आम्ही तिची फार मजा घेतो या गोष्टीवरून. पण कुठल्याही गावातली प्रत्तेक आजी जशी ‘पंजा’वर ठाम असते तशी ती तीच्या मतावर अगदी ठाम आहे. डाव्या हाताने ठेवलेली वस्तू सापडत नाही म्हणजे नाही.

घरात काही ही सापडले नाही की आम्ही तिघे (मी आणि बहिणी) मोठ्याने म्हणायचो.. “अरे!!. डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” आणि मग घरात एकदम हशा पिकायचा.

वरून ती म्हणायची “हो!! तुम्हाला तर सगळे खोटच वाटते.. अरे खरंच सांगते आहे मी” मग आम्ही सुरेन शर्माने ‘चार लाईना’ सुनावल्या सारखे पुन्हा हसायचो… 🙂

मी तिला नेहमी म्हणायचो “अग! एक तर मी आहे डाखोरा.. तुझे जर खरे मानले तर मी घरात कुठल्याही गोष्टीला हात नको लावायला? “.

बरं आहे ही गोष्ट अगदीच खरी नाही आहे.. नाहीतर अमिताभ, सचिन तेंडुलकर, सौरभ.. वैगरेंची जाम पंचाईत झाली असती. सचिनला बॅटिंगला जायचे आहे आणि काय तर म्हणे साहेब आपली बॅट शोधता आहेत.. हा!! हा!! हा!!

माणसाचा एकदा का कोणत्या गोष्टी बद्दल समज बसला की काही केल्या जात नाही… ते सुपरस्टेशियस जे म्हणतो ना तेच. लोकांचे असेच विचित्र समज असतात. आमचे बाबा मला कधीच शनीवारी कटिंगला(म्हणजे केस कापायला.. बाग काम नव्हे.. पण आमच्या भैय्या साठी दोन्ही ही कामे सारखीच..:-) ) जाऊ देत नाही.. का विचारलं तर.. “नाही.. म्हटले म्हणजे नाही.. ” एव्हडेच उत्तर मिळते… 😦 शनिवार आणि रविवार दोनच दिवस मिळतात.. त्यातही शनिवारी नाही म्हटले म्हणजे रविवाराचा अर्धा दिवस त्या भैय्याच्या दुकानात जातो.. तो ही या गोष्टीचा फायदा घेत सगळे भोजपुरी गाणे लावतो… रविवाराची सकाळची झोप जाते ती वेगळीच.

हुम!! जाऊद्या काय करणार… 😦

मी जेव्हा अमरावतीत इंजिनियरिंग कॉले़जमध्ये होतो तेव्हाची ही आठवणं.

मी १२ जरा बऱ्यापैकी मार्काने पास झालो. याचे सगळे श्रेय आईला.. तिने जर रागावून, गदा-गदा हालवून, प्रसंगी पांघरूण ओढून मला रोज सकाळी उठवून अभ्यासाला बसवले नसते तर आज हे दिवस दीसले नसते.. असो. माझ्यापेक्षा तिलाच जास्त काळजी होती. तुम्हाला खोटे वाटेल पण त्या वर्षी आमच्या घरातला टी. व्ही. कपाटात बंद होता.. असो. तर जरा बरे मार्क मिळाले त्यामुळे अमरावतीला जाऊन इंजिनियरिंगच फॉर्म भरून आलो. सरकारी कोट्यामध्ये बडनेरा इंजिनियरिंग कॉले़जमध्ये प्रवेश मिळाला.

अमरावती असल्यामुळे घरच्यांना काळजी नव्हती. अमरावतीमध्ये माझे बरेच नातेवाईक आहेत. आत्या, दूरचा मामा, मावशी आणि शिवाय माझी मोठी बहीण सुद्धा अमरावतीतच दिली आहे. कॉलेज सुरू व्हायच्या आधी मी आणि बाबा रूम शोधायला अमरावतीत होतो. (तुम्ही म्हणाल इतके नातेवाईक असताना रूम कशाला.. पण माझे आणि बाबांचे मत होते की ४ वर्ष नातेवाईकाकडे??… नको त्यापेक्षा रूम बरी) . कॉलेज सुरू झाल्यावर २-३ महिन्यात मी सावरकर काकू कडे पेइंग-गेस्ट म्हणून राहायला गेलो.

आमच्या सावरकर काकू म्हणजे अगदी प्रेमळ, मनमिळाऊ. घरचे तसे श्रीमंत पण दोन्ही पोर पुण्याला शिकायला होते, घरी या एकट्या असायच्या. कोणाचीतरी सोबत असावी म्हणून मग वरच्या मजल्या वरील एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. काकूंनी आम्हाला मुलासारखंच सांभाळलं. खायला-प्यायला कधीच कमी केले नाही. त्यांच्या हातच्या पुरण-पोळ्या आहाहाहा!!!.. अरे विषयांतर होतंय..

तर अशा आमच्या काकू, त्यांच्या बंगल्यावर लोकांची बरीच वर्दळ असायची. काका आर्किटेक्ट होते. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता त्यामुळे घराकडे बरीच लोक असायची. तेव्हा त्यांच्याकडे बरीच माणसे कामाला असायची त्यातले एक म्हणजे “हमिद भैय्या”. त्यांचे रोजचे काम म्हणजे शीबुला, काकूंकडे पाळलेली कुत्री, रोज सकाळी तिला खाऊ घालणे आणि समोरच्या गेटपाशी बांधून येणे. आता लोकांचे, मुख्यता मराठी, एक कळत नाही, मुसलमान माणसाशी हे हिंदीत का बोलतात?.. खरं तर ते महाराष्ट्रात राहतात, त्यांचा जन्म इथला, तर मग उगीचच हिंदीचा अट्टहास का?… त्यांची खरंतर उर्दू भाषा असते. मराठी आणि तामिळ भाषेत जितका फरक आहे तितकाच उर्दू आणि हिंदीतही आहे की. बरं एक वेळ हे मान्यही केलं असत पण आपल्या मराठी माणसाची हिंदी म्हणजे.. वा!! काय बोलता.. 🙂

आमच्या काकूंची हिंदी पण एकदम सॉलिड. सकाळी त्याच्या हिंदीतल्या ऑर्डरी सुरू व्हायच्या.

‘हमिद भैय्या!!. वो शीबू की साखळी इकडे बांधो’..

‘हमिद भैय्या!!. वो शीबू को दूध-पोळी टाक्या के नही? ‘..

‘हमिद भैय्या!!. शीबू ने उपर बाल्कनी मे कुच घाण किया क्या बघो तो जरा.. ‘

‘हमिद भैय्या!!. जल्दीसे गाडी धुवो सहाब को जाना है. ‘

वैगरे.. वैगरे…

अशा अनेक हिंदी(?? )त्ल्या ऑर्डरी सुरू होत असत.. आम्ही मात्र पोट धरून हसत बसायचो.. 🙂