पदवी कॉल्ड “बाबा”..

ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो शेवटी ३ सप्टेंबरला तो दिवस उजाडला. मी “बाबा” झालो. एका गोंडस जीवाने या धरतीवर आपल्या आगमना प्रीत्यर्थ “ट्याट्या” फोडून मला आणि सौला अनुक्रमे “बाबा” आणि “आई” अशा पदव्या बहाल केल्या.

मातीचा गणपती उठला आणि जिवंत मूर्ती घरात आली. सगळे अगदी खूश होते. माझ्या आई-बाबांना तर आभाळ ठेंगणे झाले होते. सगळ्या आप्त-सकीयांचे फोन येण्यास सुरुवात झाली.

“Congrats!! “.. “Hearly congratulations!! ” वैगरे वैगरे.

बऱ्याचं लोकांचा एक कॉमनं प्रश्न असायचा.. “मग आता काय बदल जाणवतोय? “..

“बराच.. पुण्याला बिलकुल पाऊस नाही हो.. आणि मुंबईत बघाना कसा धो-धो पडतोय”.. मी आपला निरागस उत्तर देत होतो.

“अहो.. तसे नाही हो.. बाबा झालात ना तुम्ही मग.. काय बदल वाटतोय? ”

आता या सद्ग्रुहस्ताला कोणीतरी बाबा झाले की दोन छोटीशी शिंग फुटतात किंवा अचानक केस पांढरे होतात किंवा मिशा येतात असे काही तरी सांगितले असावे. म्हणून २-३ वेळा विचारून खातरी करत असावे. आता मला सांगा मुलगा होऊन जेमतेम १-२ दिवस झालेले, त्यात असा कुठला बदल जाणवणार आहे हो?.. असो

आता या प्रश्नावर विचार केल्यावर असे वाटते की खरंच, काय बदल अपेक्षीत असला पाहिजे? चेहऱ्यावर ४० वर्षे जजची खुर्ची सांभाळून रिटायर्ड झाल्या सारखा गंभीर चेहरा करावा की आहे तसंच हसत खेळत राहावे.

माझ्यामते तर मला माझे बालपण या चिमुकल्या बरोबर पुन्हा जगायला आवडेल. बघूया कितपत जमतेय ते.. 🙂

Advertisements

कार चालक प्रशिक्षण – एक छळ..

भारतात आल्या-आल्या काय जोष चढला होता काय माहिती पण कार घेण्याचे भूत माझ्या मनात थैमान घालते होते… (काय आहे बँकेत जरा जास्त पैसे दिसतं असले की त्याला वाट फोडण्याचे असे खूळ माझ्या मनात आलेच म्हणून समजा.. ) तर पहिली पायरी म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायचे ठरवले व नोंदणी केली.

प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता आणि त्या प्रशिक्षकाने मला माझ्या संपूर्ण शालेय जीवनात कोणी झापलं नसेल असे धडे(झापले) दिले. मी आपला अमेरिकेचा जवळ-जवळ २०००-२५०० माईल्स कार चालवण्याचा अनुभव चेहऱ्यावर मिरवतं कारमध्ये बसलो. मी आणि अजून एक आजोबा आणि एक तरुणी (बहुतेक तिला तिच्या वडिलांनी “तुला तुझ्या पुढच्या वाढदिवसाला कार घेऊन देणार” असे आश्वासन दिले असणार.. असले बाबा आम्हाला का बरं नाही मिळाले.. 😦 असो)

प्रथम आजोबांनी कारचा ताबा घेतला.. बहुतेक सीनियर सिटीजनाच नियम येथे सुद्धा लागू होतो असा त्यांचा समज असावा कारण ‘त्या’ तरुणीने जेव्हा प्रथम ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजोबांनी जो कटाक्ष टाकला त्यामुळे ती सुद्धा बिचकली. एक तर सकाळची ऑफिसची वेळ त्यामुळे ट्रॅफिक अपनी पुरी जवानी पे था आणि दुसरे म्हणजे नेहमी प्रमाणे रस्त्याचे काम सुरू होते त्यामुळे आणखीन कोंडी होत होती आणि आजोबा आपल्या तरुण पणीचे दिवस आठवतं तो एक्सलेटर पूर्णं जोर लावून दाबत होते. त्यांचा चेहरा बघून तो जोर “दुसरी” कडे पडून काही भलतेच होईल का अशी शंका वाटत होती 🙂 आजोबा पूर्णतः गडबडले होते कारण इतका एक्सलेटर दाबूनही ही गाडी पुढे का जात नाही.

“काय करताय पहिले गेयर तर टाका. ” तुसडेपणा या शब्दाचा पुरेपूर समर्थन करीत त्या प्रशिक्षकाने आपला दिवस सुरू झाल्याची ग्वाही दिली.

“अहो.. काय करताय.. नीट बघा.. वळवा ना.. अरे गेयर बदला ना.. ” असे एक ना दोन पाणउतारा करणारे घोषवाक्य म्हणत तो आम्हाला शिकवत (??? ) होता. मग आजोबांचे खेळणे झाल्यावर “त्या” तरुणीने गाडीचा ताबा घेतला. मी असतील-नसतील तेव्हड्या देवांना साकडं घातले (एक कोणीतरी येईलच वाचवायला).

तिने बसल्या-बसल्या पहिले हॉर्न वाजवला. मला वाटले की ती तपासून बघत असेल. पण नंतर पूर्णवेळ ती त्या हॉर्नवरच बसली होती. तिला बहुतेक घरून सांगितले असेल “बेटा.. दर २-३ सेकंदाने हॉर्न वाजवायचा”. मी अमेरिकेतले दिवस आठवत होतो.. तिथे खरंतर हॉर्न हा गाडीचा ऑप्शनल पार्ट असतो… असो 🙂

मग शेवटी माझी वेळ आली. मी आपला आपल्याला गाडी येते या तोऱ्यात बसलो. गाडी चालू केली आणि एक्सलेटर दाबला. पण हे काय? गाडी पुढे का जात नाही? मग प्रशिक्षकाने गोड आवाजात “अहो.. गेयर तर टाका. नुसते एक्सलेटर काय दाबताय. “वैगरे बोलून माझा उद्धार सुरू केला. मी आपला अरे हो खरंच की वैगरे बोललो आणि गेयर टाकायला गेलो तर.. “ख्खरखर्ख्र” असा विचित्र आवाज येत होता. मग तो प्रशिक्षक जाम चिडला व कुठून-कुठून लोक गाडी शिकायला येतात असला “लुक” देत गेयर टाकला.

मग मी त्या जत्रेरुपी रोड(??? काही केल्या दिसतं नव्हता) वर निघालो. डावीकडून, उजवीकडून मागून पुढून (अवचोर ध्वातात – अर्थात चारही दिशांनी) सगळीकडून बाइक, कार, सायकल, पादचारी, गाय, म्हॅस (ह्या शेवटच्या दोन वाहनांवर कोणी बसले नव्हते 🙂 ) असे विविध वाहने येत होती. मला तर वाटत होते की अजून काही वेळात गाडी वरून सुद्धा काही वाहने निघतील. तो प्रशिक्षक सारखा माझ्या अंगावर खेकसत होता “अरे.. गाडी चालवा.. वेग वाढवा” मी मात्र पूर्णतः गडबडलो होतो. साला जागा कुठे आहे गाडी जायला.

शेवटी हो-नाही करत एकदाचा माझा क्लास संपला(एकदाचा). नंतरच्या क्लास मध्ये मी त्या प्रशिक्षकाला कधीच सांगितले नाही की मला गाडी येते म्हणून.. 😦

ती…

Posted: ऑगस्ट 25, 2009 in Uncategorized

आज सकाळी मी काढलेले फोटो बघत होतो आणि अचानक फोटोमध्ये कोपऱ्यातील एका गोष्टीकडे लक्ष गेले. “ती” किती कैतुकाने माझ्याकडे बघत होती. तिला मला खूश बघून किती आनंद होत होता. ती आपला एकटेपणा जराही भासवत नव्हती. तिला कळून चुकले होते की आता माझा सहवास तिला क्वचितच लाभणार आहे. तरी ती खूश होती, हसत होती. माझ्या डोळ्या समोरून मागचे ७-८ वर्ष भारकानं सरकली.

पहिल्या भेटीतच मी तिचा फॅन झालो होतो. तेव्हाच ठरवले होते की हीच माझ्या “राह की हमसफर” होणार. पहिल्यांदा मी तिला जेव्हा घरी घेऊन आलो होतो तेव्हा सगळे कसे अगदी खूश झाले होते तिला पाहून. मी तर तिला सोबत घेतल्या शिवाय बाहेर पडायचोच नाही. तिने पण कधी कुरकूर केली नाही, रात्री-बेरात्री केव्हाही ती माझ्या सोबत बाहेर जायला हसत-खेळत तयार असायची. कधीही मला त्रास दिला नाही.

मागच्या वर्षी मी अमेरिकेला होतो त्यामुळे ती एकटी पडली होती. तिला कोणी वालीच नव्हता. तरी ती माझ्या वाटेकडे टक लावून बसली होती. मी आलो आणि तिची कळी खुलली. तिला मला पाहून इतका आनंद झाला की बस. तिला आभाळ ठेंगणे झाले होते.

पण… मला तिच्यातला बदल लक्षात आला. ती फार थकलेली दिसत होती. आता ती पहिल्यासारखी वेगाने फिरू शकत नव्हती. तिला बराच त्रास होत होता. ती फार थकली होती. आता मला सुद्धा आता तोडी अडचण व्हायला लागली होती.

पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. शेवटी एक दिवस मी नाइलाजाने करा घेऊन आलो. काल करा चे फोटो बघत असताना कोपऱ्यात उभी असलीली माझी “ती” बाइक अगदी एकाकी वाटत होती. माझ्याकडे ती केविलवाण्या नजरेने पाहत होती. माझा जीव एका क्षणासाठी का होईना पण कासावीस झाला. तिला जर खरंच बोलता आले असते तर?? तिने आपली अगतिकता अगदी ओरडून सांगितली असती का?.. पण न बोलता सुद्धा ती बरेच काही बोलून गेली 🙂

सोबत गाडीचा फोटो देतो आहे.. अणी कोपऱ्यात उभी आहे “ती”..
IMG_1406

कंदील लाईट डीनर

कंदील लाईट डीनर

त्याचे झाले असे की, आम्ही सगळे हॉल मध्ये टी. वाही. समोर रात्री जेवायला बसलो असताना नेमके लाइट गेले. सिरीयाला बघताना सगळ्यांची छान तंद्री लागली होती आणि अशा अचानक व्यत्ययामुळे सगळ्यांचा मूड गेला.
मग मेणबत्त्यांची शोधा-शोध झाली. आजकाल मेणबत्ती ही पूर्वी सारखी ऑप्शनल वस्तू न राहता लोड-शेडिंगमुळे गरजेची होऊन बसली आहे. एक वेळा चहापत्ती घ्यायला विसरा पण मेणबत्ती विसरू नका.

यावरून मग जुन्या गोष्टी निघाल्या. आम्ही जेव्हा बुलढाण्याला होतो तेव्हा आमच्याकडे लाइट नव्हते. कंदील, चिमण्या(हा एक दिव्याचा प्रकार आहे 🙂 ), मेणबत्त्या हे तेव्हाचे आमचे उजेडाचे सामान होते. त्यावेळी ‘दिवेलावणी ची वेळ’ ही एक वेळ होती आणि कामही होते.

वात, रॉकेल, कंदिलाची काच वैगरे प्रकार आणायला घरात माझीच निवड होत असे. केरोसिन किंवा ‘मिटी का तेल’ हे एक वेळ समजू शकते पण रॉकेल ही काय भानगड आहे हे काही मला अजूनही कळले नाही. बहुतेक रॉकेल हा ‘रॉक ऑइल’ या शब्दाचा अपभ्रंश असावा. त्या वेळेला या केरोसिनच्या गाड्या फिरत असत. त्यावर इंग्लिशमध्ये केरोसिन लिहिलेले असायचे. मजा म्हणजे प्रत्येक गाडीवर वेग-वेगळे स्पेलिंग असायचे. ‘kerosene’, ‘kerosine’. एका गाडीवर तर चक्क केरोसिनचे ‘keroseen’ असे लिहिले होते. लहानपणी तर मला असे वाटायचे की ‘मिटी का तेल’ म्हणजे माती जोरात दाबली की तेल निघते. गंमत म्हणजे एक-दोनदा मी हा प्रकार करूनही बघितला होता.

आमचे रोजचे डिनर हे ‘कंदील लाइट डिनर’ असायचे. त्यावेळी जेवायला पाने घेणे हे एक काम असायचे. आता कसे ज्याला वाटेल तो एक डीश उचलतो आणि टी. वाही. समोर जेवायला बसतो. तर त्या वेळी सगळ्यांसाठी पाट घेणे. तेव्हा सहसा कोणाकडे डायनिंग टेबल नसायचे. सगळे खाली बसूनच जेवत असत. तर पाट घेणे, लोटी-भांडे भरून घेणे, ताट-वाट्या-पेले घेणे. अशी सगळी तयारी करावी लागे. सगळे कुटुंब गोलाकार करून जेवायला बसत असत आणि मध्यभागी का ‘कंदील’ असे. कोण कुठे बसणार ह्या जागा ठरलेल्या असायच्या. मग गप्पा-टप्पा, कोणाचा दिवस कसा गेला वैगरे आणि आग्रह पण होत असे रोजच्या जेवणात. आता तर गप्पा तर विसराच पण जेवण सुद्धा त्या टी. वाही. कडे पाहूनच होते.. असो

ह्या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना लाइट आले आणि आम्ही पुन्हा त्या टी. वाही. च्या आहारी जाऊन सिरीयाला बघण्यात गुंग झालो.

चला आता-उद्या करता करता अमेरिकेला निरोप देण्याचा दिवस शेवटी उगवलाच. माणसाच्याही इच्छा परिस्थिती नुसार कशा बदलतात बघा.. मागच्या वर्षी याच वेळेस मी आमच्या मॅनेजरला भांडवून सोडले होते.. कधी पाठवता ऑन-साईटला म्हणून… आणि आता अक्षरशः हात जोडून म्हणावे लागले की बाबा जाऊ दे वापस मला.. 🙂

माणसाचा स्वभाव असतो ना बघा हातच सोडून पळत्याच्या मागे लागतो.. तसलं काही होत होत बघा.. म्हणजे बाहेरच जग मला जे ऑफर करत होत ते मला त्या वेळेच्या परिस्थितीत अगदी उलट असायचं.. असो सगळंच नेहमी जर आपल्या मनाप्रमाणे झालंतर शरद उपाद्धे आणि तो बेजान दारूवाला चे खायचे वांदे व्हायचे. या बेजान दारुवालाच्या आई-वडिलांनी त्याचे नाव ‘बेजान’ का ठेवले हेच कळले नाही.. त्याच्या अखंड शरीराकडे बघून(म्हणजे कॅमेऱ्यात बसेल तेव्हड्या) असे वाटत नाही की हा ‘बेजान’ आहे म्हणून.. असो.

मी जेव्हा अमेरिकेला आलो तेव्हा आमचे तारे तसे काही खास चमकत नव्हते. ज्या प्रोजेक्टसाठी आलो होतो त्याचे ‘गुण-गाणं’ अगदी क्लायंट पासून ते आमच्या सीनियर मॅनेजमेण्ट पर्यंत झाले होते.. मी जेव्हा येथे पोचलो तेव्हा एका मीटिंग नंतर आमच्या बॉसने व सीनियर मॅनेजरने गाडीत बसवून काय-काय ऐकवले होते म्हणून सांगू.. :-(.. आणि आता प्रोजेक्ट सक्सेस्फुल झाल्यावर याच सीनियर मॅनेजरने ‘चांगली कामगिरी’ म्हणून प्रेझेण्टेशन दिले होते. आमच्या नशिबी निखळ प्रशंसा नाहीच म्हणा.. 😦

मागच्या वर्षी माझी आणि अमेरिकेची इकॉनॉमीकल हालत सारखीच म्हणजे ‘हलाखीचीच’ होती. मी तर बरंच सावरलो आहे पण अमेरिकेला अजून वेळ आहे. अमेरिकेतल्या लोकांनी जर माझी किंवा भारतातल्या बहुतांश जनतेची “बचत” प्रवृत्ती जर अंगिकारली तर हे सुद्धा लवकर सावरतील… 🙂 काय तर म्हणे जो जास्त पैसे उधळतो (क्रेडिट हीस्ट्री) तो जास्त चांगला.. जाऊद्या मी काही अर्थशास्त्र विशारद नाही त्यामुळे या विषयावर न बोलणे बरे..

अमेरिकेकडून शिकण्यासारख्या बऱ्याचं चांगल्या गोष्टी आहेत. त्यांचा ड्रायव्हिंग सेन्स, त्यांची सामाजिक जाणीव, कायद्याला धरून वागणूक, स्वच्छता (कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी जा.. कुठेच तुम्हाला कचरा टाकलेला किंवा साचलेला सापडणार नाही आणि आश्चर्य म्हणजे आपले भारतीय पण सुतासारखे सरके वागतात.. आपल्या घरीच नेमके काय होते यांना काय म्हाइत.. 😦 ). या वादाच्या मुद्द्यात जास्त काही जात नाही… असो

या अमेरिका वारीत बरेच नवीन मित्र भेटले, जुन्या कॉलेज च्या मित्रांची पण गाठ-भेट झाली.. मजा आली. शिवाय हा “कट्टा” पण येथूनच सुरू केला. या आधुनिक कट्ट्यावर सुद्धा बरेच सगे-सोयरे भेटले आहेत. :-).. बऱ्याचं ऐतिहासिक घडामोडी झाल्यात.. ओबामा, मायकल जॅक्सन, बॉब मे, वैगरे वैगरे..

मी वापस येणार म्हणुन तिकडे घरी तर जय्यत तयारी सुरू आहे.. आपला मुलगा जणु कही एखादे युद्ध वैगरे जिंकून वापस येतो आहे अशा थाटात तयारी सुरू आहे.. मला तर काल चक्क आई आणि बायको चांगल्या नटून-थटून दारात आरती घेऊन उभ्या आहेत.. बाबा गच्चीवर जाऊन सगळ्या कॉलोनीत साखरेच्या पुड्या वाटता आहेत (बहुतेक हत्त्ती मिळाला नसेल).. आई मला “गाजर का हलवा” चे चांदीच्या चमच्याने घास भरवते आहे. (हो प्रत्तेक हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे मला सुद्धा गाजराचा हलवा आवडतो.. बहुतेक लहानपणी आईने शिरीष कणेकरांचे “मुलाला हिरो बनवण्याचे १० उपाय” फारच सीरियसली घेतले होते वाटते.. 🙂 पण थोडक्यात तिची इच्छा अधुरी राहिली.. असो ).. बायको “पाहा माझा नवरा किती मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे” अशा आवेशात मिरवते आहे.. असले काही स्वप्न पडले होते.. 🙂

एकंदरीत “लाईफ-टाइम” एक्सपेरीयन्स होता… बायको सोबत घालवलेला डिसेंबर महिना तर अजूनही पूर्णं लक्षात आहे.. :-).. आता पुन्हा अमेरिकेला यायचा योग येईल असे वाटत तर नाही त्यामुळे “अखेरचा दंडवत” करून भारतवारी सुरू करतो.. 🙂

मां.. मै आरहा हु मां.. (धर्मेद्र स्टाइल उच्चारणं केले तर मजा येईल.. 🙂 )

बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई संक्रांतीच्या हळदी-कुंकासाठी बाहेर गेली होती. तिला बराच वेळ लागणार होता कारण गल्लीतल्या ५-६ ठिकाणी कारेक्रम होता. घरी मी आणि बाबा. सहसा आईचा हळदी-कुंकाचा प्रोग्रॅम असला की मी घरीच असायचो.. ती घरी आली की पहिले मी त्या ओटी वर हल्ला करायचो.. ओटीतले बोरं, शेंगा, हरबरे, गाजर, ऊस शोधून खाण्यात वेगळीच मजा आहे. आमच्याकडे हळदी-कुंकू असले की आई मला बाहेर पिटाळायची… कारण ओटीतले निम्मे ऊस मीच फस्त करत असे. मला ऊस खूप आवडतो. तोही दातांनी सोलून. कोणी ऊसाचे छोटे-छोटे तुकडे केले की मला बिलकुल आवडतच नाही… बाबा आजही रवीवारी ऊस दिसला की न विसरता आणतातच… असो

घरी मी आणि बाबांच होतो.. दोघांनापण भूक लागली होती. मग बाबांनी सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. आमचे बाबा तसे उत्तम कुक. त्यांच्या हातची स्पेशल कचोरी म्हणजे माझी ऑल-टाइम फेवरेट. पण घाई-गडबडीत नेहमी काहीतरी गडबड होते आणि डीश बिघडते.. :-).

कीत्तेक वेळेस तर बाबांनी मसाल्याचा चहा करताना चहात चहा मसाला न टाकता ‘गरम मसाला’ टाकला आहे. मग सगळे खापर आईवर फोडल्या जाते..

” ही न नेहमी ते डबे इकडचे तिकडे करत असते.. त्यामुळे माझा गोंधळ होतो.. ” बाबा त्यांचे हे पेटेंट वाक्य बोलून फसलेल्या प्रयोगावर झाक घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

आता तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. मी ‘मसालेदार’ चहाचा पहिला घोट घेतल्यावर लगेच ओळखतो की आईने पुन्हा गरम मसाल्याची बाटली बदली म्हणून.. :-).

बरं चश्मा घालत जा म्हटले तर “हो!! मला काय धाड भरली आहे न दिसायला??.. ” असे उत्तर मिळते.

अशीच नेहमी सारखी गडबड करत बाबांनी रव्याच्या ऐवजी चक्क ज्वारीचे पीठ वापरले. त्या वेळेस आमच्या कडे लाइट नव्हते त्यामुळे कंदीलच्या प्रकाशात पटकन लक्षातपण आले नाही.

शिरा झाला की नाही पाहायला जेव्हा बाबांनी पाहीले तर ” हा असा चिकट-चिकट का वाटतोय??.. ” म्हणून खाऊन पाहिलं व तेव्हा लक्षात आले की बाबांनी नवीन पाककृतीचा शोध लावला आहे.. 🙂

बरं शिरा चांगला साजुक तुपात, काजू-कीशमीश घालून बनवला होता त्यामुळे फेकायची इच्छा होत नव्हती. मग काय.. त्या दिवशी डोळे बंद करून, पाण्यासोबत ढकलत खावा लागला.. 🙂

तेव्हापासून आईला कुठे बाहेर जायचे असले की काहीतरी बनवूनच जाते.. काय सांगता पुन्हा कुठला नवीन पदार्थ खावा लागेल.. 🙂

या २३ तारखेला आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्णं झालीत की हो… पण आम्ही दोघे अजून एकत्र मिळून साजराच करू शकलो नाही. म्हणजे बघा २००८ मध्ये पहिला वाढदिवस तेव्हा मी नुकताच एकटा अमेरिकेला आलो होतो आणि आता वापस जातो आहे तो पण ३० तारखेला.. म्हणजे हा पण हुकला. बायको तशी काही तक्रार करत नाही पण ह्याची व्याजासकट भरपाई करावी लागणार आहे हे नक्की.. 🙂 तशी ती आपणहून काही मागणार नाही.. पण काय आहे भविष्यातील युद्धात (युद्ध = एखादी महागडी, कधीही कामी न येणारी वस्तू मागणे ) वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दरुपी शस्त्रात ह्या शस्त्राची भर पडायला नको.
“हो!! मी कधी काही मागितले आहे का तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला? आता ही एकच गोष्ट मागते आहे ना.. ” असो

आत्ता बायकोला फोन केला तर “कोण आहे?? ” या टिपीकल पुणेरी स्वागत वाक्याने आमचा फोन घेतल्या गेला शिवाय “काय बाई लोक असतात.. रात्री-अपरात्री फोन करतात” हे फोन करण्याला ऐकू जाईल अशा स्वरात पुटपुटली. तिचे पण काही चूक नाही म्हणा. एकतर हा दिवस मला लक्षात राहील असा पुसटसाही विचार तीच्या मनात डोकावला नसेल (मोबाईल रिमाइंडर की जय!!! ) आणि मॅडम एकदा झोपल्या की बस!! लेडी-कुंभकर्ण आहे. 🙂 त्यात तिने रात्री १२:०० वाजता फोन घेतला हेच माझे भाग्य.

लग्नाला २ वर्षे पूर्णं झाले असले तरी अजून आमचा जेमतेम एखादं वर्षाचा संसार झाला असेल. त्यामुळे “चार लाईना” लिहीण्या इतपत अनुभव गाठीशी जमा झालेला नाही. तरी या एका वर्षात बरेच उतार-चढाव आलेत. “मुझे तुम याद करना ऑर मुझको याद आना तुम.. ” आणि “तुमसे जुदा होकर.. ” वैगरे गाणीपण झालीत. प्रेमरस, विरहरस, ध्वंदरस वैगरे रसपण झालेत.

बायकोतर्फे “भावनाशून्य दगड” ही उपाधी मला लग्नाच्या २-३ महीन्या नंतरच बहाल करण्यात आली आहे त्यामुळे जास्त काही लिहीत नाही. हो पण बायकोला एकच सांगावेसे वाटते आतापर्यंत जशी माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिलीस तशीच पुढेही राहा. आतापर्यंत समोर येईल त्या सुखद व दुःखद क्षणांना माझ्या सोबत हसत मुखाने सामोरे गेलीस तशीच कायम राहा… कारण तूच माझी शक्ती आहेस.. 🙂

आता इथेच थांबतो.. बायको साता समुद्रापलीकडे असल्यावर शब्दही सुचत नाही हो..