Posts Tagged ‘काकू’

मी जेव्हा अमरावतीत इंजिनियरिंग कॉले़जमध्ये होतो तेव्हाची ही आठवणं.

मी १२ जरा बऱ्यापैकी मार्काने पास झालो. याचे सगळे श्रेय आईला.. तिने जर रागावून, गदा-गदा हालवून, प्रसंगी पांघरूण ओढून मला रोज सकाळी उठवून अभ्यासाला बसवले नसते तर आज हे दिवस दीसले नसते.. असो. माझ्यापेक्षा तिलाच जास्त काळजी होती. तुम्हाला खोटे वाटेल पण त्या वर्षी आमच्या घरातला टी. व्ही. कपाटात बंद होता.. असो. तर जरा बरे मार्क मिळाले त्यामुळे अमरावतीला जाऊन इंजिनियरिंगच फॉर्म भरून आलो. सरकारी कोट्यामध्ये बडनेरा इंजिनियरिंग कॉले़जमध्ये प्रवेश मिळाला.

अमरावती असल्यामुळे घरच्यांना काळजी नव्हती. अमरावतीमध्ये माझे बरेच नातेवाईक आहेत. आत्या, दूरचा मामा, मावशी आणि शिवाय माझी मोठी बहीण सुद्धा अमरावतीतच दिली आहे. कॉलेज सुरू व्हायच्या आधी मी आणि बाबा रूम शोधायला अमरावतीत होतो. (तुम्ही म्हणाल इतके नातेवाईक असताना रूम कशाला.. पण माझे आणि बाबांचे मत होते की ४ वर्ष नातेवाईकाकडे??… नको त्यापेक्षा रूम बरी) . कॉलेज सुरू झाल्यावर २-३ महिन्यात मी सावरकर काकू कडे पेइंग-गेस्ट म्हणून राहायला गेलो.

आमच्या सावरकर काकू म्हणजे अगदी प्रेमळ, मनमिळाऊ. घरचे तसे श्रीमंत पण दोन्ही पोर पुण्याला शिकायला होते, घरी या एकट्या असायच्या. कोणाचीतरी सोबत असावी म्हणून मग वरच्या मजल्या वरील एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. काकूंनी आम्हाला मुलासारखंच सांभाळलं. खायला-प्यायला कधीच कमी केले नाही. त्यांच्या हातच्या पुरण-पोळ्या आहाहाहा!!!.. अरे विषयांतर होतंय..

तर अशा आमच्या काकू, त्यांच्या बंगल्यावर लोकांची बरीच वर्दळ असायची. काका आर्किटेक्ट होते. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता त्यामुळे घराकडे बरीच लोक असायची. तेव्हा त्यांच्याकडे बरीच माणसे कामाला असायची त्यातले एक म्हणजे “हमिद भैय्या”. त्यांचे रोजचे काम म्हणजे शीबुला, काकूंकडे पाळलेली कुत्री, रोज सकाळी तिला खाऊ घालणे आणि समोरच्या गेटपाशी बांधून येणे. आता लोकांचे, मुख्यता मराठी, एक कळत नाही, मुसलमान माणसाशी हे हिंदीत का बोलतात?.. खरं तर ते महाराष्ट्रात राहतात, त्यांचा जन्म इथला, तर मग उगीचच हिंदीचा अट्टहास का?… त्यांची खरंतर उर्दू भाषा असते. मराठी आणि तामिळ भाषेत जितका फरक आहे तितकाच उर्दू आणि हिंदीतही आहे की. बरं एक वेळ हे मान्यही केलं असत पण आपल्या मराठी माणसाची हिंदी म्हणजे.. वा!! काय बोलता.. 🙂

आमच्या काकूंची हिंदी पण एकदम सॉलिड. सकाळी त्याच्या हिंदीतल्या ऑर्डरी सुरू व्हायच्या.

‘हमिद भैय्या!!. वो शीबू की साखळी इकडे बांधो’..

‘हमिद भैय्या!!. वो शीबू को दूध-पोळी टाक्या के नही? ‘..

‘हमिद भैय्या!!. शीबू ने उपर बाल्कनी मे कुच घाण किया क्या बघो तो जरा.. ‘

‘हमिद भैय्या!!. जल्दीसे गाडी धुवो सहाब को जाना है. ‘

वैगरे.. वैगरे…

अशा अनेक हिंदी(?? )त्ल्या ऑर्डरी सुरू होत असत.. आम्ही मात्र पोट धरून हसत बसायचो.. 🙂

Advertisements