Posts Tagged ‘डावा’

काल मी आय-पॉड चार्जींग केबल शोधत होतो… काही केल्या मिळत नव्हते.. सगळे घर ‘उथल-पुथल’ केले (‘अंदाज अपना अपना’ चा हा संवाद मला फार आवडतो.. असो) तर फार शोधल्यावर सापडत नव्हते. जवळ-जवळ १ तास शोधल्यावर शेवटी मी हार मानली व त्याचा पिच्छा सोडला.

आता इथे आई जर असती तर “तू डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” हा तिचा टिपीकल डायलॉग मारला असता.

आईचा हा एक भारी समज आहे. कुठलीही वस्तू तुम्हीजर डाव्या हाताने ठेवली तर ती सापडत नाही. आम्ही तिची फार मजा घेतो या गोष्टीवरून. पण कुठल्याही गावातली प्रत्तेक आजी जशी ‘पंजा’वर ठाम असते तशी ती तीच्या मतावर अगदी ठाम आहे. डाव्या हाताने ठेवलेली वस्तू सापडत नाही म्हणजे नाही.

घरात काही ही सापडले नाही की आम्ही तिघे (मी आणि बहिणी) मोठ्याने म्हणायचो.. “अरे!!. डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” आणि मग घरात एकदम हशा पिकायचा.

वरून ती म्हणायची “हो!! तुम्हाला तर सगळे खोटच वाटते.. अरे खरंच सांगते आहे मी” मग आम्ही सुरेन शर्माने ‘चार लाईना’ सुनावल्या सारखे पुन्हा हसायचो… 🙂

मी तिला नेहमी म्हणायचो “अग! एक तर मी आहे डाखोरा.. तुझे जर खरे मानले तर मी घरात कुठल्याही गोष्टीला हात नको लावायला? “.

बरं आहे ही गोष्ट अगदीच खरी नाही आहे.. नाहीतर अमिताभ, सचिन तेंडुलकर, सौरभ.. वैगरेंची जाम पंचाईत झाली असती. सचिनला बॅटिंगला जायचे आहे आणि काय तर म्हणे साहेब आपली बॅट शोधता आहेत.. हा!! हा!! हा!!

माणसाचा एकदा का कोणत्या गोष्टी बद्दल समज बसला की काही केल्या जात नाही… ते सुपरस्टेशियस जे म्हणतो ना तेच. लोकांचे असेच विचित्र समज असतात. आमचे बाबा मला कधीच शनीवारी कटिंगला(म्हणजे केस कापायला.. बाग काम नव्हे.. पण आमच्या भैय्या साठी दोन्ही ही कामे सारखीच..:-) ) जाऊ देत नाही.. का विचारलं तर.. “नाही.. म्हटले म्हणजे नाही.. ” एव्हडेच उत्तर मिळते… 😦 शनिवार आणि रविवार दोनच दिवस मिळतात.. त्यातही शनिवारी नाही म्हटले म्हणजे रविवाराचा अर्धा दिवस त्या भैय्याच्या दुकानात जातो.. तो ही या गोष्टीचा फायदा घेत सगळे भोजपुरी गाणे लावतो… रविवाराची सकाळची झोप जाते ती वेगळीच.

हुम!! जाऊद्या काय करणार… 😦

Advertisements