Posts Tagged ‘बाबा’

अश्रूंची ठेच…

Posted: सप्टेंबर 26, 2010 in अनूभव.., आठवणी..!!
टॅगस्

fathersonरात्रीचे ११:०० वाजले होते. मी नेहमी प्रमाणे माझया खोलीत अभ्यास करत होतो. बाबा बैठकीतल्या पलंगावर पहुडले होते. आई नुकतेच तिचे स्वैपाक घरातले काम आटपून खाटेवर पडली होती. मी अभ्यासात गुंग होतो. बाहेर कुणाचे तरी हुंदके ऐकू येत होते. मला पहिले वाटले की मला भास झाला असावा. थोड्या वेळाने आईची हाक ऐकु आली.

“प्रसाद…प्रसाद…अरे हे बघ ना कसे करताय”

मला पहिले कळलेच नाही काय झाले आहे ते. बाबांना नेहमी पित्ताचा त्रास होत असतो. मला वाटले की आज पुन्हा काही त्रास होतोय, म्हणून मी लगेच बैठकीत धाव घेतली.

मी बैठकीतले दृश्य बघून हबकलोच. बाबा, एकदम कडक, खंभीर स्वभावाचे, ते सोबत असताना कशाचीच भीती वाटायची नाही, ते बाबा आज लहान मुलासारखे हतबल होऊन रडता आहेत.

“मी मुलांसाठी काहीच करू शकलो नाही…मी आयुष्यात तुलाही कधी काहीच सुख देऊ शकलो नाही..मुलांची हौस-मौज नाही की काही नाही..” बाबा आईजवळ आपल्या मनातला बांध फोडून रडत होते. आईला काय करावे काही सुचत नव्हते. ती मला आणि बहिणीला हाका मारून बोलावत होती.

“अहो..असे काय करताय..शांत व्हा..सगळे ठीक होईल..सगळं चांगलेच तर चालले आहे..तुम्ही असे धीर सोडू नका..”

गरिबी, पैसा माणसाला इतका हतबल करू शकतो? पैसा हा माणसाच्या जिवापेक्षा मोठा झाला आहे?..आमची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाबांची सरकारी नोकरी, पगारात जेमतेम भागात होते. आई शिवणकाम, कुकिंग क्लासेस वैगरे करून हातभार लावत होती. मोठ्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा होतो. शिवाय दुसर्‍या बहिणीचे लग्न, माझया शिक्षणाचा खर्च, हे होतच की. बाबांच्या मनावरील ताण बरेच दिवस झाले जाणवत होता. तो ज्वालामुखी आज फुटला होता.

“प्रसाद..जा तर शेजारच्या काका ना बोलाव…”. आईच्या या वाक्याने मी भानावर आलो. मला अक्षर:हा काय करावे ते कळत नव्हते. मी तिथे दगडा प्रमाणे उभा होतो. माझया लहान वयाला हे सगळे कळण्याच्या पलीकडे होते. मला बाबांजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. मी जाण्याचा प्रयत्न करत होतो पण, मला असे वाटत होते की माझे पाय जमिनीत खोलवर रोवळ्या गेले आहेत.

मी कशीबशी हिंमत करून बाबाजवळ गेलो. बाबांचा हात हातात घेतला. त्यांना धीर देत म्हटले, “बाबा तुम्ही शांत व्हा..तुम्ही उगाचीच काळजी करता आहात..सगळं ठीक होणार”.

आम्ही सगळे बाबांची समजूत काढत होतो. काही वेळाने ते वादळ शांत झाले. मला बाबांचा खूप राग यायचा जेव्हा मी मागितलेली गोष्ट बाबा नाकारायचे, पण त्या दिवसा पासून मला कधी बाबांकडे हट्ट करावासा वाटळाच नाही. ते म्हणतात ना “दगडाची ठेच” माणसाला शहाणं करते ते. तशीच त्या दिवशीची ती “अश्रूंची ठेच” मला शहाणं करून गेली. त्या दिवशी त्या अश्रूंनी मला एक नवी हिंमत दिली. आज मी जे काही आहे ते त्या दिवशी जो धडा मिळाला त्यामुळेच.

आजही तो क्षण आठवला की अंगावर काटे येतात. मनात अनेक प्रश्न येतात बाबांच्या मनात नेमके काय चालले असेलत तेव्हा? त्यावेळी त्यांच्या मनात टोकाचे विचार आले असतील का? आज “झिंग चिक झिंग..” सिनेमा पाहताना तो क्षण पुन्हा डोळ्यासमोरून गेला. सिनेमात एका गरीब शेतकऱ्याची कहाणी अगदी मनाला पिळून जाते. शेतकऱ्यासाठी हे सरकारचे एका लाखाचे अनुदान आत्महत्या थांबवण्यासाठी आहे की त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रोस्साहन देतेय हेच कळत नाही.

आता डोळे जड झाले आहेत..पुढे काहीच लिहू शकत नाही….

Advertisements

बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई संक्रांतीच्या हळदी-कुंकासाठी बाहेर गेली होती. तिला बराच वेळ लागणार होता कारण गल्लीतल्या ५-६ ठिकाणी कारेक्रम होता. घरी मी आणि बाबा. सहसा आईचा हळदी-कुंकाचा प्रोग्रॅम असला की मी घरीच असायचो.. ती घरी आली की पहिले मी त्या ओटी वर हल्ला करायचो.. ओटीतले बोरं, शेंगा, हरबरे, गाजर, ऊस शोधून खाण्यात वेगळीच मजा आहे. आमच्याकडे हळदी-कुंकू असले की आई मला बाहेर पिटाळायची… कारण ओटीतले निम्मे ऊस मीच फस्त करत असे. मला ऊस खूप आवडतो. तोही दातांनी सोलून. कोणी ऊसाचे छोटे-छोटे तुकडे केले की मला बिलकुल आवडतच नाही… बाबा आजही रवीवारी ऊस दिसला की न विसरता आणतातच… असो

घरी मी आणि बाबांच होतो.. दोघांनापण भूक लागली होती. मग बाबांनी सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. आमचे बाबा तसे उत्तम कुक. त्यांच्या हातची स्पेशल कचोरी म्हणजे माझी ऑल-टाइम फेवरेट. पण घाई-गडबडीत नेहमी काहीतरी गडबड होते आणि डीश बिघडते.. :-).

कीत्तेक वेळेस तर बाबांनी मसाल्याचा चहा करताना चहात चहा मसाला न टाकता ‘गरम मसाला’ टाकला आहे. मग सगळे खापर आईवर फोडल्या जाते..

” ही न नेहमी ते डबे इकडचे तिकडे करत असते.. त्यामुळे माझा गोंधळ होतो.. ” बाबा त्यांचे हे पेटेंट वाक्य बोलून फसलेल्या प्रयोगावर झाक घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

आता तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. मी ‘मसालेदार’ चहाचा पहिला घोट घेतल्यावर लगेच ओळखतो की आईने पुन्हा गरम मसाल्याची बाटली बदली म्हणून.. :-).

बरं चश्मा घालत जा म्हटले तर “हो!! मला काय धाड भरली आहे न दिसायला??.. ” असे उत्तर मिळते.

अशीच नेहमी सारखी गडबड करत बाबांनी रव्याच्या ऐवजी चक्क ज्वारीचे पीठ वापरले. त्या वेळेस आमच्या कडे लाइट नव्हते त्यामुळे कंदीलच्या प्रकाशात पटकन लक्षातपण आले नाही.

शिरा झाला की नाही पाहायला जेव्हा बाबांनी पाहीले तर ” हा असा चिकट-चिकट का वाटतोय??.. ” म्हणून खाऊन पाहिलं व तेव्हा लक्षात आले की बाबांनी नवीन पाककृतीचा शोध लावला आहे.. 🙂

बरं शिरा चांगला साजुक तुपात, काजू-कीशमीश घालून बनवला होता त्यामुळे फेकायची इच्छा होत नव्हती. मग काय.. त्या दिवशी डोळे बंद करून, पाण्यासोबत ढकलत खावा लागला.. 🙂

तेव्हापासून आईला कुठे बाहेर जायचे असले की काहीतरी बनवूनच जाते.. काय सांगता पुन्हा कुठला नवीन पदार्थ खावा लागेल.. 🙂

आज् का जाणे कोणास् ठाउक्,पण् ऑफिसला जाण्याचा जाम कंटाळा आला होता.आधीच अर्धा तास उशिर् झाला होता.बाबा फिरुन् येउन “सकाळ” ला चहा सोबात् चघळत् होते.मी हॉलमध्ये आलो तसे बाबा म्हणाले ‘अरे!! अजुन् आंघोळ नाही झाली? ऑफिसला नाही जायचे का?’

‘नाही आज् फार् कंटाळा आला आहे’ मी जांभाळी देत् उत्तर् दीले.

‘अरे मग् ऑफिसला निरोप पाठउन् दे..नाही येत् म्हणुन्..’- बाबा

‘हो..हे काय् तुमचे तहसिल ऑफिस आहे का..की राउत काकाला सांगितले की झाले.’ मी हे वाक्य पुर्ण करेस्तोवर् बाबा हसायला लागले.

बाबांची नोकरी बुलढाणा या छोट्याश्या गावात् तहसिल ऑफिसला होती.माझे पुर्ण बालपण तेथेच् गेले.बाबांच्या वेळेला पॉलीसी आवडली नाही किंवा ऑफिसचा स्टाफ् आवडला नाही म्हणुन् नोकरी बदलण्याची पध्धत् नसावी म्हणुनच् ते एकदा जे तहसिल ऑफिसात चिटकले ते चिटकलेच.

तहसिल ऑफिस मधिल बहुतेकांना “ऑफिस ला येण्याची वेळ” असला फालतु प्रकार तर् माहितीच नव्हता.आमच्या बाबांची वेळ् मात्र् ठरलेली १०-१०:१० पर्यत् ते ऑफिसला असायचे.बाबाच् सर्वात् आधी ऑफिसला पोचायचे.ऑफिस म्हणजे एक् चॉक् ओलांडला की आले.एखाद्या वेळेस जर् घरी पाव्हणे आलेच् तर् २ मिनीटात् बाबा घरी असायचे.आता मला जर् असे घरी यावे लागले तर् १५-१६ की.मी. ड्राईव्ह करुन यावे आगेल् शिवाय् अर्धा दीवस् सुट्टी टाकावी लागेल्.सकाळी ६:१५ वाजता नळ् यायचे म्हणुन् ६ वाजता उठायचे,पाणी भरुन् भराभर् आंघोळी उरकाव्या लागायच्या.बाबांची पुजा मग् ८-९ वाजेपर्यत् चालत् असे.पुजा झाली की तयार् होउन् उभ्या-उभ्याच दोन पोळ्या जेवायचे.

ऑफिसची बाकिची मंडळी आरामात् ११-११:३० वाजता यायची.आल्यावर् मग् ‘बडेबाबु!! चला चहा घ्यायला'(ऑफिसमध्ये बाबांना सगळे बडेबाबु म्हणायचे)मग काय एक् दीड तासाची निचंती असायची.दुपारी १:३०-२:०० वाजता बाबा चहासाठी घरी येत् असत.चहा म्हणजे एक् निमीत्य असायच्.जेव्हा टी.व्ही. वर् दुपारी वेगवेगळ्या मालिका असायच्या.त्यात् “शांती” ही आमच्या बाबांची आवडती मालिका.नंतर् मग् उन्हाळ्याच्या सुट्टीत ताई माहेरी यायची,मग् काय् नातवासोबत खेळायला दुपारी आजोबा हजर् असायचे.हो आणी दुपारी ऑफिसला जायच्या आधी एक् १०-१५ मिनिटे झोप सुध्धा व्हायची.३ वाजता ऑफिसला गेल्यावर मग् संद्याकाळी साधारण् ५-५:१५ ला बाबा घरी येत् असत.

एखाद्या दीवशी जर् ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाच,किंवा घरी काही महत्वाचे काम् असले की मग् ‘प्रसाद्!! जा राउत काकांना सांगुन् ये की मी काही आज् ऑफिसला येत् नाही.बी.पी. चा त्रास होतो आहे म्हणाव’ सहसा हेच कारण् असायचे.बी.पी. हा त्यांचा कसलासा कोडवर्ड् असावा असा मला दाट् संशय होता.

मग् मी त्यांचा दुत बनुन ऑफिसला राउत काकांना शोधत् बसायचो.मी ईतके वेळा ऑफिसला गेलो असेल् पण् हे राउत् काका त्यांच्या जागेवर् मला कधिच भेटले नाही.मग मला अख्खे तहसिल् ऑफिस शोधावे लागायचे.नंतर्-नंतर् या राउत् काकांचे सगळे अड्डे मला माहित् झाले होते.ठरावीक वेळेस ते कुठल्या अड्ड्यावर् असतिल् हे हेरुन मी थेट् तिथेच त्यांना गाठत् असे.त्यांना निरोप् सांगितल्यावर् ‘बर्!!बी.पी. चा त्रास का. ठीक आहे.’ असे म्हणत् एक् रहस्यात्मक हास्य द्यायचे.मला तर असे वाटते आपल्यापण ऑफिसला असे राउत् काका असते तर्.

बाबा “संजय गांघी निराधार् योजना” बघत् असल्याने दर् ३-४ महिन्यात् आमच्या डोक्यावर् money order री लीहिण्याचे काम् येउन् पडत् असे.’तुमचे अक्षर् छान आहे’,’तुम्हाला उन्हाळ्यात् काय काम् आहे?’,’उन्हात् खेळण्यापेक्षा हे काम् बरे’..अशा या ना त्या कारणांवरुन् बाबा त्या money order री घरी घेउन येत् असत् व आम्हाला कामाला जुंपत् असत्.मला मात्र् फार् मजा येत् असे हे काम करण्यात्.

तर् असे ते तहसिल् ऑफिस बाबांचे जेव्हडे होते,तेव्हडेच आमचे देखिल होते.हा सगळा विचार् करत् मी ऑफिसला कधी पोहोचलो कळालेच नाही.माझा बॉस माझ्या क्युबिकल समोरच उभा होता.मला बघुन् त्याने घड्याळाकडे बघितले.

‘प्रसाद्!! व्हाय आर् यु लेट् टुडे?’

‘सकाळी थोडा बी.पी. चा त्रास होत् होता..’असे म्हणुन् मी मनातल्या-मनात् हसु लागलो.