Posts Tagged ‘रॉकेल’

कंदील लाईट डीनर

कंदील लाईट डीनर

त्याचे झाले असे की, आम्ही सगळे हॉल मध्ये टी. वाही. समोर रात्री जेवायला बसलो असताना नेमके लाइट गेले. सिरीयाला बघताना सगळ्यांची छान तंद्री लागली होती आणि अशा अचानक व्यत्ययामुळे सगळ्यांचा मूड गेला.
मग मेणबत्त्यांची शोधा-शोध झाली. आजकाल मेणबत्ती ही पूर्वी सारखी ऑप्शनल वस्तू न राहता लोड-शेडिंगमुळे गरजेची होऊन बसली आहे. एक वेळा चहापत्ती घ्यायला विसरा पण मेणबत्ती विसरू नका.

यावरून मग जुन्या गोष्टी निघाल्या. आम्ही जेव्हा बुलढाण्याला होतो तेव्हा आमच्याकडे लाइट नव्हते. कंदील, चिमण्या(हा एक दिव्याचा प्रकार आहे 🙂 ), मेणबत्त्या हे तेव्हाचे आमचे उजेडाचे सामान होते. त्यावेळी ‘दिवेलावणी ची वेळ’ ही एक वेळ होती आणि कामही होते.

वात, रॉकेल, कंदिलाची काच वैगरे प्रकार आणायला घरात माझीच निवड होत असे. केरोसिन किंवा ‘मिटी का तेल’ हे एक वेळ समजू शकते पण रॉकेल ही काय भानगड आहे हे काही मला अजूनही कळले नाही. बहुतेक रॉकेल हा ‘रॉक ऑइल’ या शब्दाचा अपभ्रंश असावा. त्या वेळेला या केरोसिनच्या गाड्या फिरत असत. त्यावर इंग्लिशमध्ये केरोसिन लिहिलेले असायचे. मजा म्हणजे प्रत्येक गाडीवर वेग-वेगळे स्पेलिंग असायचे. ‘kerosene’, ‘kerosine’. एका गाडीवर तर चक्क केरोसिनचे ‘keroseen’ असे लिहिले होते. लहानपणी तर मला असे वाटायचे की ‘मिटी का तेल’ म्हणजे माती जोरात दाबली की तेल निघते. गंमत म्हणजे एक-दोनदा मी हा प्रकार करूनही बघितला होता.

आमचे रोजचे डिनर हे ‘कंदील लाइट डिनर’ असायचे. त्यावेळी जेवायला पाने घेणे हे एक काम असायचे. आता कसे ज्याला वाटेल तो एक डीश उचलतो आणि टी. वाही. समोर जेवायला बसतो. तर त्या वेळी सगळ्यांसाठी पाट घेणे. तेव्हा सहसा कोणाकडे डायनिंग टेबल नसायचे. सगळे खाली बसूनच जेवत असत. तर पाट घेणे, लोटी-भांडे भरून घेणे, ताट-वाट्या-पेले घेणे. अशी सगळी तयारी करावी लागे. सगळे कुटुंब गोलाकार करून जेवायला बसत असत आणि मध्यभागी का ‘कंदील’ असे. कोण कुठे बसणार ह्या जागा ठरलेल्या असायच्या. मग गप्पा-टप्पा, कोणाचा दिवस कसा गेला वैगरे आणि आग्रह पण होत असे रोजच्या जेवणात. आता तर गप्पा तर विसराच पण जेवण सुद्धा त्या टी. वाही. कडे पाहूनच होते.. असो

ह्या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना लाइट आले आणि आम्ही पुन्हा त्या टी. वाही. च्या आहारी जाऊन सिरीयाला बघण्यात गुंग झालो.

Advertisements