Posts Tagged ‘sky-walk’

Fabulous Las Vegas..भाग् – १

दुसरा दिवस:

५-६ तासांचे ड्रायव्हिंग आणि दिवसभराचा थकवा, यामुळे उठायला थोडा उशीर झाला. आम्ही सगळे ७:३० पर्यंत तयार झालो. चलो-चलो करण्यात ८:०० वाजले. लिफ्टमध्ये जाताना थोडी शंका आली होतीच की आपण South rim Grand canyon national park चा पत्ता घेतला की नाही. सहसा मी विसरत नाही पण या वेळेस जरा गडबड झालीच. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही ‘Sky-walk’ ला गेलो होतो त्यामुळे South rim चा पत्ता मला सुद्धा माहिती नव्हता. (बरं झालं बायको नव्हती सोबत नाहीतर.. ‘आमचे हे जरा धांध्रटच आहेत’ ही समज अजून पक्की झाली असती आणि पुरावा सुद्धा मिळाला असता.. असो) आता काहीतरी मार्ग काढणे भाग होते कारण येथे मध्येच थांबून ‘भैय्या.. ये Grand canyon national park किधरकू पडता है? ‘ असे विचारता ही नसते आले.. खरं तर तसे तो रस्ता पुर्णपणे डेझर्ट मधूनंच जातो त्यामुळे विचारायला आम्हाला ‘गोरे कुत्रं’ सुद्धा सापडले नसते. (अमेरिकेत आहे म्हणून काळ्याच्या ऐवजी गोरा म्हटले) मग एक-दोन मित्रांना फोन करून पत्ता शोधून काढला आणि हे मित्र ऐन वेळी चुकीचा पत्ता देऊन कुठलीही ‘पुरानी दुश्मनी’ वैगरे काढणार नाहीत असे मनाला पटवले आणि देवाचे नाव घेऊन आम्ही निघालो. हे सगळं करता करता आम्हाला ९:४५- १०:०० झाले.

ऊन बरंच वाढलं होत. ‘मामा’ (ट्रॅफिक कॉप) ची नजर चुकवत, कधी जोरात कधी स्पीड लिमीट मध्ये चालवत आम्ही चाललो होतो. एक तर US-93 हा फ्री-वे अगदी सुता सारखा सरळ आहे. अगदी तुम्ही मध्ये एखादी डुलकी जरी घेतली तरी कोणाला कळणार नाही. कुठे म्हणजे अगदी कुठेच त्याला वळण नाही, शिवाय ट्रॅफिकही नव्हत, त्यामुळे गाडी १०० माइल्स/आवर अगदी सहज टच होत होती. मजा येत होती आणि जोडीला हिमेस भाई होतेच. थिरू अण्णाची मात्र हाल होत होते. त्याला हिंदीतले एक अक्षरही कळत नाही आणि त्यावर आम्ही दोघे गळे फाडून गात होतो :-). मग जवळ-जवळ २७९ माईलस चालवल्यावर South rim Grand canyon national park चे बोर्ड दिसायला लागले. बघितले तर भली मोठी रांग एंट्रीसाठी. एक बरं असते इथे, बहुदा ते एंट्री कारमध्ये बसूनच होते, उगाच रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नाही. आम्ही सुद्धा प्रत्तेक भारतीयांन प्रमाणे एंट्री फी किती आहे हे शोधू लागलो. $२५ पर कार.. च्यायला फार महाग होत. पण आता इतके ड्रायव्हकेल्यावर तसेच परत जाण्यात काही अर्थ नव्हता. हे सगळे करेस्तोवर आम्हाला २. ३०-३:०० वाजले होते. तिकीट घेऊन आम्ही गाडी पार्क केली आणि तिकिटासोबत दिलेले मॅप्स पाहू लागलो. एक-दोन स्पॉट बघून निघूया असे ठरले. पण जेव्हा आम्ही पहिल्या स्पॉटवर पोहोचलो.. ‘सही!!!!.. ‘ आम्ही अक्षरश: स्तब्ध झालो. काय नजारा होता तो.. आहा!!!.. असे वाटत होते की आम्ही भल्यामोठ्या पेंटिंग किंवा फोटो समोर उभे आहोत. आम्ही अचानक समुद्र सपाटी पासून ७००० feet/२१३४ m वरती उभे होतो आणि विशेष म्हणजे येथे फक्त काही ठिकाणीच कुंपण केले आहे बाकीचा बराचसा भाग हा सताड उघडा आहे. म्हणजे तुमची जरा जरी नजर चुकली तर सरळ कोलोराडो नदीत अंघोळ करायला ७००० फिट खोल दरीत जाल. (अधिक तांत्रिक माहितीसाठी http://www.nps.gov/archive/grca/grandcanyon/south-rim/index.htm येथे टिचकी मारा). आम्ही सगळे तो देखवा पाहून भारावून गेलो. ते नजारे बघून सगळा ड्रायव्हिंगचा क्षीण निघून गेला. वापस जायचा मूडच होत नव्हता. पण पुन्हा ५-५:३० तासाचे ड्रायव्हिंग मला एकट्यालाच करायचे होते आणि तसे आज रात्रीचा प्रोग्रॅम जरा वेगळा 🙂 असल्याने आम्हाला लवकर निघणे भाग होते. १-१:३० तासात आम्ही पाय काठता घेतला. निघालो तेव्हा चांगलेच आभाळ आले होते. १०-१५ मिनिटांतच पाऊस सुरू झाला.. चक्क गारा पडत होत्या. 🙂 बघता-बघता आजू-बाजूला स्नो जमू लागला… एकदम सही!!.. मजा येत होती. पाच-दहा मिनिटांतच पुन्हा वातावरण बदलले आणि पुन्हा ती जीवघेणी गर्मी सुरू झाली. शेवटी लाँग ड्राइव्ह नंतर ९ वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो.

एव्हडे ८-९ तास ड्रायव्हिंग केल्यानंतर मला बिलकुल इच्छा नव्हती कुठे बाहेर जाण्याची पण आमचा थीरू अण्णा अगदी पेटला होता.. ‘वुयी मस्ट गो टु स्ट्रीप क्लब इन लास वेगास’. तसा आमचा थीरू अण्णा अगदी शांत आणि गुणी मुलगा, पण लास वेगास ला आल्यापासून साहेबांचा रंगच बदलला होता. आमच्या तिघांनधे तोच बॅचलर होता. ‘नो यार.. चुम्मा वुयी वील सी’.. (घाबरू नका तमिळ मध्ये चुम्मा याचा अर्थ ‘सहजच’ असा होतो… मी सुरवातीला जेव्हा बंगलोराला होतो तेव्हा एका मुलीच्या तोंडून हा शब्द ऐकून असाच अवाक झालो होतो. एक वेगळा पोस्ट लिहील यावर कधीतरी).. तर त्याच्या आग्रहा खातर आम्ही सगळे तयार झालो. मागच्या वेळेस बायको सोबत आलो होतो त्यामुळे प्रश्नच नव्हता. या वेळेस आम्ही दोघे ‘आम्ही नाही हा त्यातले.. ‘ ‘आम्हाला मुळी रसच नाही त्यात’ असली काहीशी भूमिका घेतली होती.. (खरं सांगायचे तर मनात सारखी धास्ती होती… नेमके आम्ही तेथे जावे आणि बायकोच्या माहेरच म्हणा किंवा तिची फॉरेनला सेट झालेली एखादी मैत्रीण आम्हाला बाहेर पडताना बघावी… असो. )

मग शेवटी सच्चा मित्र म्हणून आणि केवळ आमच्या थीरू अण्णाची इच्छा 🙂 म्हणून आम्ही इच्छित स्थळी जाऊन आलो.

Grand Canyon

क्रमशः

Advertisements